शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Kamaltai Gavai: सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी अमरावती येथे ऑक्टोबर 5, 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्यांनी एका पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कमलताई गवई यांचे नाव प्रमुख अतिथी म्हणून छापण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
कमलताई गवई यांनी पत्र जारी करत, 'माझे वय 84 असल्याने माझी प्रकृती बरी नाही, त्यामुळे मी RSS च्या कार्यक्रमात जाणार नाही,' अशी माहिती दिली. या कार्यक्रमामुळे आंबेडकरी चळवळीला वाहिलेले आपले जीवन कलंकित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे.
कमलताई गवई यांच्या पत्रातील प्रमुख मुद्दे
कमलताई गवई यांनी त्यांच्या अधिकृत पत्रात या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांचे पत्र खालीलप्रमाणे आहे:
निमंत्रणाबाबत स्पष्टीकरण: ऑक्टोबर 5, 2025 रोजीच्या कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी त्यांच्या ओळखीचे काही लोक आले होते. त्यांच्या कुटुंबाचा मैत्रीभाव व बंधुभाव सर्वांप्रती असल्याने त्यांनी सर्वांचे स्वागत केले.
वादावर प्रतिक्रिया: कार्यक्रमाचे वृत्त प्रसारित होताच, अनेकांनी त्यांच्यावर तसेच स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावरही टीका करत दोषारोपण केले. यामुळे त्या व्यथित आणि दुःखी आहेत.
( नक्की वाचा : Gandhi Jayanti Speech : महात्मा गांधी जयंतीनिमित्त शाळेत करा 'हे' दमदार भाषण, तुमचा पहिला क्रमांक नक्की )
आंबेडकरी विचारधारेचा ठाम निर्धार: कमलताई गवई यांनी स्पष्ट केले की, त्यांनी आपले जीवन आंबेडकरी चळवळीला आणि विपश्यनेला वाहिले आहे. 'आपण कुठेही गेलो तरी आंबेडकरी विचारच मांडणार. ते आपण शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही हा आपल्या संस्काराचा भाग आहे,' असे त्यांनी निक्षून सांगितले.
विरोधी मंचावर जाण्याची भूमिका: स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्या धोरणाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, दादासाहेब जाणूनबुजून अशा विरोधी मंचावरती जायचे आणि तेथे वंचितांचे प्रश्न मांडायचे. त्यांनी संघाच्या कार्यक्रमात जाऊनही कधीही हिंदुत्व स्वीकारले नाही; उलट समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरच भाषण केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानिक विचारांची मांडणी केली.
माझे स्पष्टीकरण: त्या मंचावर गेल्या असत्या, तरी आंबेडकरी विचार आणि विपश्यनाच मांडली असती, असे त्यांनी स्पष्ट केले.
गैरहजेरीचे कारण: वस्तुस्थितीला धरून नसलेल्या टीकेमुळे आणि या कार्यक्रमामुळे आपले जीवन कलंकित होत असल्याच्या प्रयत्नामुळे त्या दुःखी आहेत. तसेच, 'माझे वय 84 असून प्रकृती बरी नसल्याने मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. कुठेतरी थांबले पाहीजे या कारणाने ऑक्टोबर 5 च्या कार्यक्रमात जाणार नाही,' असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.