Kharif Crop Planning: अल निनोच्या संकटात शेती वाचवणार 'हा' फॉर्म्युला; यंदाच्या खरिपात 'या' पिकांची करा निवड

Kharif Crop Planning 2026:: आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पिकांच्या निवडीबाबत अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Kharif Crop Planning 2026: शेतीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या तयार राहण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. (प्रतिकात्मक फोटो)
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Kharif Crop Planning 2026: बदलत्या हवामानाचा आणि वाढत्या तापमानाचा फटका आता थेट आपल्या शेतीला बसू लागला आहे. यंदा अल निनोच्या संकटामुळे मान्सूनच्या पावसात मोठा खंड पडण्याची आणि पाऊस असमान राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असली, तरी नेमकी कोणती पिके घ्यावीत आणि पेरणी कधी करावी, या चिंतेने राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या संभ्रमात पडला आहे. 

या कठीण आणि अनिश्चिततेच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती पद्धतीला थोडा फाटा देऊन, बदलत्या हवामानाशी सुसंगत असे नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या हवामान संकटाचा सामना करण्यासाठी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पिकांच्या निवडीबाबत अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला आहे.

Advertisement

यंदाच्या खरीप हंगामात पावसाची अनिश्चितता मोठ्या प्रमाणावर असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेरणीची अजिबात घाई करू नये. जोपर्यंत जमिनीमध्ये पुरेसा आणि समाधानकारक पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करणे टाळावे. 

यंदा जास्त पाण्याची गरज असणाऱ्या पिकांऐवजी अत्यंत कमी कालावधीत येणाऱ्या आणि कमी पाण्यातही शेतात खंबीरपणे तग धरू शकणाऱ्या पिकांच्या वाणांची निवड करण्यावर शेतकऱ्यांनी सर्वाधिक भर देण्याची गरज असल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. हे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास पावसाचा खंड पडला तरी पिकांचे नुकसान टळू शकते.

( नक्की वाचा : Monsoon Prediction निसर्गाची अद्भूत शक्ती! 'या' पक्ष्याच्या अंड्यांवरून ठरतो मान्सूनचा काळ; वाचा काय आहे पद्धत )
 

कोणत्या पिकांवर द्यावा भर?

हवामानातील हा बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीत मोठा बदल करणे अपेक्षित आहे. यंदाच्या मोसमात सोयाबीन, बाजरी, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या तुलनेने अत्यंत कमी पाण्याची गरज असलेल्या पिकांचा विचार अग्रक्रमाने करायला हवा. ही पिके कमी पाण्यातही चांगला उतारा देतात आणि बाजारात त्यांना मागणीही चांगली असते. 

यासोबतच पावसाचे पडणारे पाणी शेतातून वाहून न जाता ते जास्तीत जास्त जमिनीत कसे मुरेल, यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेताची योग्य बांधबंदिस्ती करावी, चर खोदावेत आणि जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांवर विशेष भर द्यावा, जेणेकरून कोरड्या काळातही पिकांना जमिनीत साठलेल्या पाण्याचा आधार मिळेल.

Advertisement

नारायणगाव कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शेतीतज्ज्ञ डॉ राधाकृष्ण गायकवाड यांनी शेतकऱ्यांना बदलत्या परिस्थितीत उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. पावसातील वाढती अनिश्चितता पाहता शेतकऱ्यांनी दररोजच्या हवामान अंदाजाचा नियमित आढावा घेऊनच आपली पेरणी आणि पुढील पीक नियोजन करावे. 

आपल्या भागात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून, केवळ कमी पाण्यात टिकणाऱ्या पिकांकडेच आपले पूर्ण लक्ष केंद्रित करावे. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांना योग्य रीतीने पुरेल याची काळजी घेणे या काळात सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

पर्यायी रब्बी हंगामाचे नियोजन आतापासूनच ठेवा तयार

शेतीतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या तयार राहण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे जर एखाद्या वेळी खरीप हंगाम हातातून गेला किंवा अपेक्षेप्रमाणे पिके आली नाहीत, तर अजिबात खचून न जाता लगेचच पुढच्या रब्बी हंगामाचे नियोजन आतापासूनच डोक्यात ठेवावे. 

खरीप हंगामात जर पाऊस उशिरा झाला, तर त्या पाण्याचा साठा करून रब्बी हंगामात कमी पाण्यात येणारी पिके कशी घेता येतील, याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. संभाव्य हवामान बदलाच्या या काळात केवळ एकाच पिकावर किंवा एकाच हंगामावर अवलंबून न राहता, हवामानाशी सुसंगत असे चोख नियोजन करणे हीच आता काळाची गरज बनली आहे.