विशाल पुजारी, प्रतिनिधी
Kolhapur Accident: दिवाळीमध्ये भाऊबीजेपूर्वी कोल्हापूर-राधानगरी मार्गावर आज (21 ऑक्टोबर) झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एका 10 वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर आहे. दिवाळीचा बाजार करून घरी परतत असताना कौलव (Kaulav) येथे भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातामुळे तरसंबळे (Tarasmable) येथील कांबळे कुटुंबावर दिवाळीच्या सणात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघात आणि मृतांची नावे
कौलव गावाजवळील 'बुवाचा वडा' येथे दुपारी सुमारे 1:00 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Bank Holiday: तुमच्या शहरात बुधवारी पाडव्याच्या दिवशी बँका सुरू राहणार का बंद? लगेच करा चेक )
मृत्यू झालेल्यांची नावे
श्रीकांत कांबळे (वय 30, रा. तरसंबळे)
दीपाली गुरुनाथ कांबळे (वय 28, रा. शेंडूर, ता. कागल) - श्रीकांत यांची सख्खी बहीण.
शिवज्ञा सचिन कांबळे (वय 3)
गंभीर जखमी मुलावर आयसीयूमध्ये उपचार:
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अथर्व गुरुनाथ कांबळे (वय 10) या मुलावर कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर प्रचंड आक्रोश केला.
( नक्की वाचा : RSS Diwali Message: संघ स्वयंसेवक दिवाळी शुभेच्छा देताना 'या' 5 गोष्टींचा उल्लेख का करत आहेत? जाणून घ्या अर्थ )
कसा झाला अपघात?
श्रीकांत कांबळे हे त्यांची बहीण दीपाली, भाची शिवज्ञा आणि भाचा अथर्व यांच्यासह दिवाळीचा बाजार करून तरसंबळे गावाकडे दुचाकीवरून निघाले होते. दीपाली गुरुनाथ कांबळे यांचा विवाह 2011 मध्ये झाला होता, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे त्या अथर्वला सोबत घेऊन सणासाठी माहेरी आल्या होत्या. भाऊ-बहीण दोघांनी मिळून बाजार केला आणि घरी परतत असताना भाऊबीजेपूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली.
घटनेच्या वेळी अपघातस्थळी बाजूला शेतात काम करणाऱ्या काही लोकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्याचे प्रयत्न केले. मात्र, रुग्णवाहिका उशिरा आल्याने काही निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागल्याची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी दिली.
कोल्हापूर-राधानगरी मार्गावर वाढले अपघातांचे प्रमाण
या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी याच मार्गावर एका महाविद्यालयीन तरुणीचा अपघातात मृत्यू झाला होता. तसेच, गेल्या वर्षी देखील सणासुदीच्या काळात अपघातात अनेकांनी जीव गमावला होता. रस्त्याची अपुरी रुंदी, वाढती रहदारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत.