विशाल पुजारी, कोल्हापूर
आरोग्य यंत्रणेला काळीमा फासणारी एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना कोल्हापूर शहरात समोर आली आहे. एका निवृत्त सिव्हिल डॉक्टरने बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट चालवल्याचे उघड झाले असून, करवीर पोलिसांनी कदमवाडी रोडवरील 'प्रतिमा हॉस्पिटल'वर धाड टाकून संबंधित डॉक्टरला रंगेहाथ पकडले आहे.
डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या निवृत्त सिव्हिल डॉक्टरचे नाव आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान या डॉक्टरने 250 हून अधिक महिलांचे बेकायदेशीर गर्भपात केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे राज्याला दोन-दोन आरोग्यमंत्री लाभलेल्या जिल्ह्यातच हा भीषण प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कशी झाली कारवाई?
करवीरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची साखळी 26 जुलै रोजी उघडकीस येण्यास सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी कळंबा येथील एका थ्री स्टार लॉजवर पोलिसांनी कारवाई करून सराईत गुन्हेगार स्वप्निल केरबा पाटील याला बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करताना पकडले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी आश्विनी गजानन शिंदे या महिला एजंटला ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत तिची कसून चौकशी केली असता, तिने धक्कादायक माहिती दिली.
(नक्की वाचा- Nagpur News: आधी देवाला हात जोडले, कान धरून माफी मागितली अन्...; चोरांचा दानपेटीवर डल्ला, VIDEO व्हायरल)
मुलींचा गर्भपात करण्याचा काळोख धंदा
ज्या गरोदर महिलांना गर्भात मुलगी असल्याचे लिंगनिदान चाचणीत स्पष्ट व्हायचे, त्या रुग्णांचा बेकायदेशीर गर्भपात कदमवाडी रोडवरील भीमनगर हाऊसिंग सोसायटी येथील 'प्रतिमा हॉस्पिटल'मध्ये डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्याकडून केला जात असल्याचे आश्विनीने कबूल केले.
पोलीस सापळा अन् डॉक्टरांचा पर्दाफाश
महिला एजंटने दिलेल्या माहितीच्या आधारे करवीर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी कदमवाडी येथील प्रतिमा हॉस्पिटलवर नियोजनबद्ध सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी डॉ. चंद्रकांत गायकवाड याला ताब्यात घेतले. पोलिसांनी रुग्णालयाची झाडाझडती घेतली असता, आरोपी डॉक्टरने बेकायदेशीर कामासाठी लपवून ठेवलेले सोनोग्राफी मशीन पोलिसांना दाखवले. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले आहे.
(नक्की वाचा- लोक हसले, पण गडी खचला नाही; 4 आंबे साडेतीन लाखांना विकून दाखवले, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याची देशभर चर्चा)
10 ठिकाणी बजावली होती वैद्यकीय सेवा
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. चंद्रकांत गायकवाड याने आपल्या सेवाकाळात राज्यातील तब्बल 10 वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली होती. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याने खाजगी रुग्णालयाच्या आड हे बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट सुरू केले होते. सध्या करवीर पोलीस या रॅकेटमध्ये आणखी कोणत्या परिचारिका, एजंट किंवा इतर डॉक्टरांचा समावेश आहे का, याचा सखोल तपास करत आहेत.