विशाल पुजारी, प्रतिनिधी
Kolhapur News : शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचाने स्वतःच्या विरोधातच मतदान केल्याचा प्रकार घडला आहे. अविश्वास ठरावामध्ये झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर या बाबतीत गोंधळ सुरू झाला. या प्रकारानंतर संबंधित उपसरपंच पूजा पाटील यांनी गोंधळ निर्माण झाल्याने चुकून स्वतःच्या विरोधात मतदान केलं असं तहसीलदारांना सांगत फेरमतदानाची मागणी केली. मात्र तहसीलदारांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. मतदान होऊन निकाल जाहीर झाला असून, पुन्हा मतदान घेता येत नाही असं स्पष्ट केलं. तसेच या निर्णयावर असमाधान असल्यास न्यायालयात दाद मागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मात्र स्वतःच्या विरोधात मतदान केलेल्या या प्रकाराची सध्या कोल्हापुरात चर्चा आहे.
काय नेमकं प्रकरण आहे..?
उपसरपंच आम्हाला विश्वासात घेऊन काम करत नाहीत, असा ठपका ठेवत खिद्रापूर (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीतील सात सदस्यांनी एकत्र उपसरपंच पूजा शिवगोंडा पाटील यांच्यावर बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता थेट अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावामुळे खिद्रापूरमध्ये मोठा राजकीय भूकंप दिसून आला. या ठरावावर निर्णय घेण्यासाठी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेची अधिसूचना काढली. या सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.. 12 ऑगस्ट रोजी ठरावानंतर मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेत 10-0 असा निकाल आला. त्यामुळे उपसरपंच पूजा पाटील यांच्या विरोधी निकाल पाहायला मिळाला. त्यानंतर पाटील यांना स्वतःच्या विरोधातच मतदान केल्याचं लक्षात आलं.
नक्की वाचा - Circuit Bench: कोल्हापुरातील घरांच्या किमती दुप्पट होणार? सर्किट बेंचमुळे काय बदलणार? Viral मेसेजचं सत्य समोर
उपसरपंचाना न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला
उपसरपंच पाटील यांनी तत्काळ आक्षेप घेत गोंधळून गेल्याने अविश्वासाच्या बाजूने मतदान केल्याचे सांगत फेरमतदानाची मागणी केली. तहसीलदार हेळकर यांनी ती फेटाळून लावत मतदान होऊन निकाल जाहीर झाला असून पुन्हा मतदान घेता येत नाही, असे स्पष्ट केले. तसेच, या निर्णयावर असमाधान असल्यास योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याचा सल्लाही त्यांनी दिला.