विशाल पुजारी
गोकुळ दूध संघाच्या सभेत दरवर्षी गदारोळाचे वातावरण पाहायला मिळत असतं. सत्ताधारी पॅनेलच्या शेवटच्या सभेत देखील गोंधळच झाला. प्रश्नोत्तराच्या काळात दोन्ही बाजूकडून जोरजोरात घोषणाबाजी झाली. मात्र यंदा अध्यक्षानी पहिल्यांदाच शांततेत अहवाल वाचन केलं. मात्र शेवटच्या टप्प्यात झालेल्या गोंधळामुळे गोकुळची सभा म्हणजे राडा हे समिकरण कायमच राहीलं. मात्र यंदाच्या सभेतला संघर्ष वेगळा पाहायला मिळाला. मुश्रीफ विरुद्ध महाडिक असा गोंधळ या सभेत होता. गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक 2026 ला पार पडणार आहे. त्यापूर्वीची ही सर्वसाधारण सभा होती. गोकुळ दूध संघामध्ये सध्या शाहू आघाडीची सत्ता आहे. तर राजर्षी शाहू हे विरोधी पॅनल आहे. मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांचे सत्ताधारी पॅनलमध्ये तर महाडिक गट हे विरोधी पॅनलमध्ये आहेत. त्यामुळे दरवर्षी महाडिक विरुद्ध पाटील असा संघर्ष पाहायला मिळत असतो. मात्र यंदाच्या सभेत मुश्रीफ विरुद्ध महाडिक असा गोंधळ रंगला.
गोकुळची 2026 च्या निवडणुकीपूर्वीची अंतिम सर्वसाधारण सभा सुरू झाली. संचालक शौमिका महाडिक या सभासदांमध्ये बसलेल्या होत्या. तर सत्ताधारी पॅनलचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील हे देखील सभासदांमध्ये उपस्थित होते. गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ आणि इतर संचालक व्यासपीठावर बसले होते. गोकुळची सर्वसाधारण सभा सुरू झाली की सभासद आत येण्याच्या वेळेसच गदारोळ सुरू होतो. काही बोगस सभासद सभेमध्ये बसवले जात असायचे. त्यामुळे तसेच सभासदांना आत सोडले जात असत. यंदा मात्र सभासदांचा प्रवेश शांततेत झाला. सभा सुरू होण्यापूर्वी सर्व सभासद आत मध्ये बसलेले होते.
संचालक मंडळाचे नेते सभेच्या स्थळी उपस्थित झाल्यानंतर काही प्रमाणात घोषणाबाजी झाल्या. तिथून पुढे संपूर्ण सभेच्या ठिकाणी शांत वातावरण होतं. गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ हे अहवालाचे वाचन करत असताना सभासदांनी शांततेत ऐकून घेतलं. पण ज्यावेळेस प्रश्नोत्तराचा काळ सुरू झाला त्यावेळी मात्र गदारोळाची परिस्थिती निर्माण झाली. संचालिका शौमिका महाडिक या ज्यावेळेस बोलण्यासाठी उभा राहिल्या त्यावेळेस हा गोंधळ आणखीन वाढला. दोन्ही बाजू कडून जोरजोरात घोषणाबाजी सुरू झाल्या. दरवर्षी महाडिक विरुद्ध पाटील अशा घोषणाबाजी असायच्या मात्र यंदाच्या सभेत महाडिक विरुद्ध मुश्रीफ अशा घोषणाबाजी होत्या. यंदाच्या सर्वसाधारण सभेत अहवालामध्ये गोकुळच्या दूध संकलन, संचालक वाढ, आर्थिक वर्षातील नफा आणि इतरही काही मुद्दे होते.
यामध्ये दूध संकलनामध्ये गोकूळ दूध संघाची वार्षिक उलाढाल 3 हजार 670 कोटींच्या घरात गेली तर वार्षिक 11 कोटी 97 लाख 74 हजारांचा निव्वळ नफा आहे असं सांगण्यात आलं. तसेच 20 लाख लीटर दैनंदिन दूध संकलनाचा टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती देण्यात आली. इतकच नाही तर दैनंदिन दूध संकलन 25 लाख लिटर करणार असा अजेंडाही ठेवण्यात आला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघाच्या 21 वरुन 25 संचालक वाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. संचालक शौमिका महाडिकांचा याला पहिल्यापासून विरोध आहे. मात्र वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक वाढीचा ठराव मंजूर झाला.या व्यतिरिक्त इतरही काही मुद्दे या अहवालामध्ये होते.
गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनीही सभा संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीपूर्वीची झालेली ही सभा अगदी खेळीमेळीत पार पडली असं मत व्यक्त केलं. तर संचालक शौमिका महाडिक यांनी विरोधकांना बोलूच दिले जात नाही असा सूर ओढला. या सगळ्यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी मात्र विरोधकांनी सर्व प्रश्न लेखी स्वरूपात द्यावे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ असं मत व्यक्त केलं.