विशाल पुजारी, प्रतिनिधी
Kolhapur ZP Election 2026 Updates : कोल्हापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा गोकुळ दूध संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, ज्यांना जिल्ह्याच्या राजकारणात आबाजी म्हणून ओळखले जाते, त्यांनी आता काँग्रेसला सोडचिट्टी देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कोल्हापुरात काँग्रेसला मोठे खिंडार
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागताच कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय पक्षांतराच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार सतेज पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वास पाटील यांनी आता धनुष्यबाण हाती घेण्याचे निश्चित केले आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे. आबाजींसोबत त्यांचे अनेक समर्थक कार्यकर्ते देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
( नक्की वाचा : KDMC Election : कल्याण डोंबिवलीतील 'या' प्रभागात बिग फाईट, आमदार ते माजी महापौरांपर्यंत सर्वांची प्रतिष्ठा पणाला )
या संपूर्ण राजकीय घडामोडीत करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 10 जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आबाजींचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती नरके यांनी अधिकृतपणे दिली.
गोकुळच्या राजकारणातील एक मातब्बर नेता आपल्या गटात आल्याने आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
गोकुळच्या राजकारणातील समीकरणे बदलणार
विश्वास पाटील हे गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ गोकुळ दूध संघाच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी अनेक वेळा गोकुळचे अध्यक्षपद भूषवले आहे. साधारण 6 महिन्यांपूर्वी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांची या पदावर निवड झाली होती. तेव्हापासूनच आबाजींच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आता त्यांनी थेट सतेज पाटील यांची साथ सोडून महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने गोकुळमधील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : Eknath Shinde: राज्यात सत्तेचा अजब खेळ, भाजपापाठोपाठ शिवसेनेचाही AIMIM बरोबर युती, परळीत अक्रितच घडलं! )
पक्षांतरामागील नेमके कारण काय?
विश्वास पाटील यांनी अचानक काँग्रेस सोडण्याचा निर्णय का घेतला, याबाबत आता विविध चर्चांना उधाण आले आहे. राजकीय जाणकारांच्या मते, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या कुटुंबातील व्यक्तीला संधी मिळावी, अशी आबाजींची इच्छा आहे.
त्यांच्या मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी त्यांनी हा राजकीय मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे. स्वतःसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी नवीन राजकीय व्यासपीठ मिळवण्यासाठी आबाजींनी ही मोठी खेळी खेळली आहे.