जाहिरात

KDMC Election कल्याण डोंबिवलीतील 'या' प्रभागात बिग फाईट, आमदार ते माजी महापौरांपर्यंत सर्वांची प्रतिष्ठा पणाला

Kalyan Dombivli Municipal Election 2026: कल्याण डोंबिवलीत अनेक प्रभागांमध्ये दिग्गज नगरसेवकांचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे.

KDMC Election कल्याण डोंबिवलीतील 'या' प्रभागात बिग फाईट, आमदार ते माजी महापौरांपर्यंत सर्वांची प्रतिष्ठा पणाला
KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीतील 'या' प्रभागातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
कल्याण:

Kalyan Dombivli Municipal Election 2026: कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे.   महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 20 जागांवर भाजप आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांनी बिनविरोध बाजी मारली असली, तरी खऱ्या संघर्षाची ठिणगी उर्वरित 102 जागांवर पडणार आहे. अनेक प्रभागांमध्ये दिग्गज नगरसेवकांचे राजकीय भविष्य पणाला लागले असून या बिग फाईटकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपली सर्व ताकद पणाला लावल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

आमदारांच्या घरातच प्रतिष्ठेची लढाई

प्रभाग 1 मध्ये राजकीय प्रतिष्ठा सर्वोच्च टोकावर पोहोचली आहे. शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे भाऊ प्रभूनाथ भोईर यांच्या पत्नी सुप्रिया भोईर रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर मनसे आणि उद्धव सेनेचे आव्हान आहे. विशेष म्हणजे उद्धव सेना आणि मनसेची युती असूनही त्यांनी आपले स्वतंत्र उमेदवार कायम ठेवून शिंदे सेनेला रोखण्याचा निर्धार केला आहे. 

याच प्रभागातून आमदारांचे दुसरे भाऊ जयवंत भोईर देखील नशीब आजमावत आहेत. त्यांच्या विरोधात मनसेचे सचिन शिंदे आणि उद्धव सेनेचे निलेश भोर उभे असल्याने ही लढत आमदारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

( नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी )

दिग्गजांच्या प्रभागातील राजकीय पेच

भाजपसाठी देखील ही निवडणूक सोपी नाही. माजी खासदार कपिल पाटील यांचे निकटवर्तीय वरुण पाटील दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विजयासाठी भाजपने कंबर कसली असून त्यांच्यासमोर उद्धव सेनेच्या भरतकुमार वायले यांचे कडवे आव्हान आहे. दुसरीकडे शिंदे सेनेच्या शालिनी वायले आणि उद्धव सेनेच्या राजश्री तिकुडवे यांच्यातही जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.

 प्रभाग 2 मध्ये भाजपचे दया गायकवाड आणि उद्धव सेनेचे विक्रांत गायकवाड आमनेसामने आहेत. तसेच दिवंगत माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या पत्नी अनघा देवळेकर (शिवसेना) आणि  सिताबाई नाईक (शिवसेना उबाठा) यांच्यात होणारी लढत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

( नक्की वाचा : KDMC Election: 'पैसे घेऊन पळकुट्या लोकांना उमेदवारी दिली', ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखावर उमेदवाराचाच खळबळजनक आरोप )

माजी महापौरांची प्रतिष्ठा पणाला

प्रभाग 4 मध्ये शिवसेनेसमोर वर्चस्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. येथे माजी महापौर वैजयंती घोलप आणि उद्धव सेनेच्या अपर्णा भोईर यांच्यात थेट मुकाबला होत आहे. माजी महापौर रिंगणात असल्याने या प्रभागातील निकालावर सर्वांचे लक्ष असेल. याशिवाय मयूर पाटील आणि त्यांच्या पत्नी नमिता पाटील हे पती-पत्नी शिंदे सेनेकडून नशीब आजमावत आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव सेनेचे राहुल कोट आणि रूपा शेट्टी यांनी शड्डू ठोकला आहे.

प्रभाग 7 मध्ये भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमलता पवार निवडणूक लढवत असल्याने येथे माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बंडखोरी आणि कौटुंबिक लढतींचा तडका

प्रभाग 11 मध्ये शिंदे सेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदे, अनुभवी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे चिरंजीव हरमेश शेट्टी आणि भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या जाऊबाई मनिषा गायकवाड यांच्यात त्रिकोणी संघर्ष पाहायला मिळत आहे.

प्रभाग 25 मध्ये भाजपने तिकीट नाकारल्याने मनसेत गेलेले शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक हे तिघेही रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या अधिकृत उमेदवारांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

प्रभाग 29 मध्ये देखील पती-पत्नीच्या जोड्या रिंगणात असून विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्यासह नितीन पाटील आणि रंजना पाटील यांच्या विजयासाठी शिंदे सेनेने पूर्ण जोर लावला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com