Kolhapur News: रात्रीचा गोंधळ, घरांची तोडफोड आणि भव्य मोर्चा; कोल्हापुरात पुन्हा धार्मिक वादाची ठिणगी

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कबनूर गावात एका महिलेने महापुरुषांच्या फलकाचा अवमान केल्याच्या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Kolhapur News : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कबनूरमधील दर्ग्यासमोरच हा वाद उफाळून आला.
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कबनूर गावात एका महिलेने महापुरुषांच्या फलकाचा अवमान केल्याच्या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचे पडसाद शेजारच्या इचलकरंजी शहरातही उमटले असून हिंदुत्ववादी संघटनांनी भव्य मोर्चा काढून  निषेध नोंदवला आहे. विशेष म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कबनूरमधील दर्ग्यासमोरच हा वाद उफाळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मध्यरात्री  गोंधळ आणि तोडफोड

ही संपूर्ण घटना 22 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. कबनूर ग्रामपंचायतीच्या भाजी मंडईत एका महिला भाजी विक्रेत्याचा शेजारील व्यक्तीशी वाद झाला होता. या वादादरम्यान संबंधित महिलेने महापुरुषांच्या फोटोचा अवमान करून अर्वाच्च भाषा वापरल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. यामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रत्नाप्पा कुंभार चौकात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली.

 या जमावाने संबंधित महिलेच्या घराची तोडफोड केली, ज्यामध्ये एका दुचाकीचे आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

( नक्की वाचा : Badlapur News: बदलापूरकरांनो लक्ष द्या! शाळा आणि पालकांसाठी पोलिसांनी जारी केले नवे 'सेफ्टी रुल्स' )

इचलकरंजीत भव्य मोर्चा 

कबनूरमधील या घटनेचा निषेध करण्यासाठी इचलकरंजी शहरात भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्थानिक भाजप आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आणि आरपीआय गटाचे प्रदेशाध्यक्ष नाना वाघमारे देखील सहभागी झाले होते. 

वैयक्तिक वाद की राजकीय षडयंत्र?

कबनूरमधील या तणावामागे नेमके कारण काय, याबाबत आता विविध चर्चांना उधाण आले आहे. भाजी मंडईतील दोन व्यक्तींमधील वैयक्तिक भांडणाचे रूपांतर धार्मिक वादात झाले की यामागे काही राजकीय हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Advertisement

कबनूर ग्रामपंचायत लवकरच नगरपरिषद म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्थानिक राजकारणात आपली पकड मजबूत करण्यासाठी हा वाद पेटवला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दुसरीकडे दर्गा परिसरात लावलेला हिरवा झेंडा हे देखील वादाचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे.

( नक्की वाचा : Solapur News: सोलापूर हादरलं! सुखी संसाराला कुणाची नजर लागली? पती-पत्नीच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण उघड )

पोलीस प्रशासनाचे शांततेचे आवाहन

या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अतिरिक्त पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी दिले आहे. पोलिसांनी कबनूरमधील दर्गा परिसरात आणि मुख्य चौकात कडक बंदोबस्त ठेवला आहे. सध्या कबनूरमध्ये तणावपूर्ण शांतता असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

Advertisement

महापुरुषांचा अवमान होणे ही चुकीचीच गोष्ट आहे, मात्र त्यावरून सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Topics mentioned in this article