Kolhapuri Chappal: कोल्हापुरी चप्पल आता इंटरनॅशनल ब्रँड! प्राडासोबत महाकरार, 300 कारागिरांना मिळणार ट्रेनिंग

Kolhapuri Chappal: महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल आता जागतिक लक्झरी उत्पादन बनणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लिडकॉम आणि जागतिक ब्रँड 'प्राडा' यांच्यात सामंजस्य करार झाला असून 300 कारागिरांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Kolhapuri Chappal: ब्रँडेड कोल्हापुरी! मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा"
NDTV Marathi

Kolhapuri Chappal: महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली आणि कारागिरांच्या सृजनातून साकारलेली 'कोल्हापुरी चप्पल' आता जागतिक लक्झरी उत्पादन म्हणून ओळखली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मेड इन इंडिया'ची ताकद जगासमोर प्रभावीपणे मांडल्याचे सांगत कोल्हापुरी चपलेच्या जागतिक ब्रँडिंगसाठी इटलीच्या प्रसिद्ध 'प्राडा' (Prada) ब्रँडसोबत झालेल्या कराराचे स्वागत केले.

ऐतिहासिक सामंजस्य करार

भारतीय पारंपरिक चर्मकला जागतिक स्तरावर नेण्यासाठी जागतिक ब्रँड 'प्राडा' आणि महाराष्ट्राची 'लिडकॉम' (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) यांच्यात नुकताच सामंजस्य करार पार पडला. या करारानुसार कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांच्या कौशल्य विकासासाठी प्राडा पुढील तीन वर्षांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देणार आहे.

Advertisement

प्रशिक्षण आणि जागतिक संधी

या उपक्रमांतर्गत प्राडातर्फे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 300 पारंपरिक कारागिरांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन टेक्नॉलॉजी (KILFT) येथे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये आधुनिक डिझाइन, तांत्रिक कौशल्ये आणि डिजिटल साधनांचा वापर शिकवला जाणार आहे. विशेष म्हणजे यातील सर्वोत्तम 30 कारागिरांना इटलीतील 'प्राडा अकादमी'मध्ये प्रगत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी मिळणार आहे.

(नक्की वाचा : Missing Link Inauguration: मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट! 'मिसिंग लिंक'चे महाराष्ट्र दिनी लोकार्पण; प्रवाशांना मोठं गिफ्ट)

प्रशासकीय भूमिका आणि नियोजन

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या कराराला भारतीय परंपरेचा गौरव संबोधले, तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी लिडकॉमच्या प्रभावी अंमलबजावणीचे कौतुक केले. विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय कायदे आणि बौद्धिक संपत्ती हक्कांचा (IPR) विचार करून कारागिरांच्या पिढीजात हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा करार अत्यंत सूक्ष्म नियोजनातून करण्यात आला आहे.

लिडकॉमचे 50 वर्षांचे योगदान

लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी हा क्षण संस्थेसाठी अभिमानाचा असल्याचे सांगितले. 1 मे 1974 रोजी स्थापन झालेल्या लिडकॉमने गेल्या पाच दशकांपासून चर्मकार समाजाच्या हक्कांचे संरक्षण केले आहे. वर्ष 2009 मध्ये कोल्हापुरी चप्पलांना 'जीआय' (Geographical Indication) दर्जा मिळवून देण्यातही संस्थेचा मोठा वाटा आहे.

Photo Credit: NDTV Marathi

कशी झाली सुरुवात?

प्राडाच्या 'स्प्रिंग 2026 मेन्सवेअर' सादरीकरणानंतर या सहकार्याची प्रक्रिया सुरू झाली. प्राडाच्या प्रतिनिधीमंडळाने स्वतः कोल्हापूरला भेट देऊन कारागिरांशी संवाद साधला. या चर्चेचे रूपांतर आता एका मोठ्या जागतिक भागीदारीत झाले असून यामुळे कोल्हापुरी चपलेचा दर्जा आता जागतिक फॅशन जगतात अधिक ठळकपणे उमटणार आहे.

Advertisement