राकेश गुडेकर
Mumbai-Goa Highway: कोकणात जाण्यासाठी मुंबई गोवा या महामार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. चाकरमान्यांचे पहिले प्राधान्य हे मुंबई गोवा हायवेलाच असते. अनेक वर्ष रखडल्यानंतर हा महामार्ग आता पुर्णत्वास जात आहे. अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. तर रखडलेली काही कामं मार्गी ही लागली आहेत. पण काम झालेल्या ठिकाणी आता नवा धोका निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. हा धोका इतका मोठा आहे की तो कोणाच्या ही जिवावर बेतेल अशी भिती निर्माण झाली आहे. याबाबत स्थानिक ही समोर येवून आवाज उठवत आहेत.
खेड तालुक्यातील वेरळ येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नव्याने उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. हाच उड्डाणपूल आता वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरत असल्याचं समोर आलं आहे. त्याला कारण ही तसेच आहे. या उड्डाणपुलावरील काँक्रीट रस्त्याला अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे कमी म्हणून की काय उड्डाणपुलाच्या मध्यभागी डिव्हायडरचे काम अजून अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे इथं लोखंडी सळ्या या उघड्यात आहेत. या उघड्यावर राहिलेल्या लोखंडी सळ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत.
विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात या सळ्यांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच काही ठिकाणी संरक्षण कठडे ही नसल्याने वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अर्धवट काम, खचलेला रस्ता आणि सुरक्षेचा अभाव लक्षात घेता, संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. याकडे वेळेवर लक्ष देणे ही गरजेचे आहे. तसे केले नाही तर मोठी दुर्घटना होण्याची भिती स्थानिक व्यक्त करत आहेत.
यामार्गावरून ये जा करणाऱ्या नियमित वाहन चालकांनी हा धोका ओळखला आहे. त्यामुळे सर्वात आधी त्यांच्याकडूनच याबाबतच्या तक्रारी केल्या जात आहेत. याची तातडीने दखल घ्यावी अशी भावना स्थानिकांची आहे. पावसाळा असला तरी अनेक चाकरमानी भात लावणीसाठी कोकणात येत असतात. लावणीनंतर गणेशोत्सवही येणार आहे. त्या आधीच ही सर्व कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र अनेक ठिकाणी कामं झाली असली तरी ती अर्धवट आहेत. तर काही ठिकाणी काम तशीच पडून आहेत. खेडमध्ये उद्भवलेल्या समस्येकडे तर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. नाही तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही अशी भिती व्यक्त होत आहे.