Konkan News : कोकणात जाणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. कोकण मार्गावरुन नियमित धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसला (Netravati Express) प्रायोगिक तत्वावर राजापूर स्थानकात थांबा मंजूर झाल्याचं रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं आहे. त्यामुळे राजापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपासून नेत्रावती एक्स्प्रेस राजापूर स्थानकात थांबणार आहे. नेत्रावती एक्स्प्रेसला राजापूर स्थानकात थांबा मिळावा, यासाठी विविध प्रवासी संघटनांसह राजकीय पक्षांनी आग्रह करत पाठपुरावाही सुरू ठेवला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आलं आहे. त्यानुसार एलटीटी-तिरुवअनंतपूरम नेत्रावती एक्स्प्रेस राजापूर स्थानकात थांबेल. गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी यामुळे फायदा होणार आहे.
नक्की वाचा - Ro Ro Ferry : कोकणातील गणेशभक्तांना बाप्पा पावणार! बोटीनं सुसाट गाव गाठता येणार.. वाचा सर्व माहिती
राजापूर रोड हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचं स्टेशन आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हा एक महत्त्वाचा थांबा आहे. आतापर्यंत नेत्रावती एक्स्प्रेसला राजापूर येथे थांबा नव्हता, त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना रत्नागिरी किंवा कणकवली स्थानकात उतरून पुन्हा घरी येण्यासाठी मोठा प्रवास करावा लागत होता. याशिवाय या थांब्यामुळे राजापूर आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांना मुंबई, गोवा याशिवाय केरळकडे प्रवास करणं सोपं होणार आहे. याशिवाय मुंबईहून कोकणात प्रवास करताना राजापूर स्थानकात उतरता येत असल्याने त्यांचा बराच वेळ वाचणार आहे.
राजापूर स्थानकात थांब्याची वेळ..
नेत्रावती एक्स्प्रेस राजापूर स्थानकात सायंकाळी 7.40 वाजता आगमन होऊन 7.42 वाजता मार्गस्थ होईल. परतीच्या प्रवासात सकाळी 7.38 वाजता आगमन होऊन 7.40 वाजता मार्गस्थ होईल.