कोकणात देखील पावसाचा जोर कायम आहे. कोकणात आज काही भागात पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्हात सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तर नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला होडावडे तळवडे पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे पर्यायी वेंगुर्ले मठ मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. कसाल, आंब्रड पोखरण, कळसुली, मार्गावर कुंदे येथे पुलावर पाणी आल्याने कसाल कळसुली मार्गावरील वाहतूक बंद झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
रत्नागिरीत जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर आहे. मात्र ही जगबुडी नदीने ही धोका पातळी ओलांडली असून सध्या जगबुडी नदी 8 मीटरवर वाहत आहे. त्यामुळे खेडमध्ये काही लोकांच्या घरापर्यंत पाणी आलं आहे. प्रशासन देखील सतर्क झालं आहे. नागरीकांनी व व्यापारी बंधूंनी शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
खेड मटण मार्केट परिसरात देखील जगबुडी नदीचं पाणी शिरलं आहे. नगरपरिषदेकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तीन तासांपासून खेडमध्ये मुसळधार कोसळत आहे. नारंगी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नारंगी नदीचं पाणी वाढल्याने खेड-दापोली मार्गावरची वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. शेकडो हेक्टर शेती देखील पाण्याखाली गेली आहे.
रायगडमध्ये खोपोली-पाली-वाकण मार्गांवर पुराचे पाणी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे येथून पालीमार्गे कोकणात जाणाऱ्या खोपोली-पाली-वाकण मार्गांवर पुराचे पाणी आले आहे. खोपोली-पाली-वाकण फाटा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. संततधार पावसाने आंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आंबा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी साचल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पातळगंगा नदी इशारा पातळीवर
रायगडमधील पातळगंगा नदी देखील इशारा पातळीवर आहे. खोपोलीत काही ठिकाणी पाणी साचले असून लौजी परिसरात गुडघाभर पाणी आहे. अनेक घरात देखील पाणी शिरले आहे.