सुनील दवंगे, शिर्डी
राज्यातील महिलांना 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेअंतर्गत दरमाह 1500 रुपये दिले जातात. मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करु असं आश्वासन दिलं होतं. महायुती सरकारची स्थापन झाल्यानंतर आता महिला लाडकी बहीण योजनेच्या निधीत वाढ होण्याची वाट पाहत आहेत. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी भाष्य केलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं की, लाडक्या बहिणींना महायुती सरकार कधी दूर करणार नाही. मार्च महिन्यात अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपयांवरुन 2100 रुपये होणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचा त्यांच्या मतदारसंघातील राहाता येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
लाडक्या बहिणींना महायुती सरकार कधी दूर करणार नाही. विरोधक म्हणायचे निवडणूक संपली की लाडकी बहीण योजना बंद होणार. मात्र महायुती सरकार ही योजना चालूच ठेवणार असून आता जानेवारीचा हप्ता येईल. मार्चमध्ये अर्थसंकल्प झाला की लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये होईल. त्याचबरोबर लाडक्या भावांना देखील सरकार वाऱ्यावर सोडणा नाही, अशा शब्द मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी दिला.
योजनेचा या महिलांना लाभ मिळणार नाही
ज्या महिलांचा परिवार इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलाकडे चार चाकी वाहन आहे त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल. ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे. ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता लाडक्या बहीणीचा लाभ घेता येणार नाही.