लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात, मध्यरात्री प्रकृती बिघडली; डॉक्टरांनी काय सांगितलं?

L. K. Advani Health Update: शुक्रवारी रात्री उशिरा आडवाणी यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती खालावली आहे. तब्येत बिघडल्याने लालकृष्ण आडवाणी यांना मध्यरात्री उशिरा दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 97 वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती पुन्हा प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आडवाणी यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या काही महिन्यांपासून आडवाणी यांच्या प्रकृतीसंदर्भात तक्रारी येत आहेत. याआधी अडवाणींना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये नेण्यात आले होते. एक रात्र एम्समध्ये राहिल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. २७ जून रोजी दिल्लीच्या एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर  04 जुलै 2024 रोजीही अडवाणी यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

प्रखर हिंदूत्ववादी विचाराचे नेते अशी ओळख असलेले लालकृष्ण आडवाणी हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपच्या जडणघडणीत तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यात आडवाणींचा मोलाचा वाटा आहे. 1980 मध्ये भाजपच्या स्थापनेपासून लालकृष्ण आडवाणी हे पक्षाचे संघटनात्मक नेते म्हणून उदयास आले. म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचे शिल्पकार तसेच लोहपुरुष म्हणूनही संबोधले जाते. 

Advertisement

लालकृष्ण आडवाणी यांनी सुमारे तीन दशके संसदीय कारकीर्द गाजवली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदीर्घ काळ राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या आडवाणी यांनी देशाचे उपपंतप्रधानपदही भूषवले आहे.  2015 मध्ये आडवाणी यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर याच वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या घरी भेट घेतली आणि त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले.

( नक्की वाचा : '.... आणि रणजीतसिंह मोहिते पाटलांना राणेंनी हाकलून लावले', गोपीचंद पडाळकर यांचा गौप्यस्फोट )