Latur MahanagarPalika Election 2026: लातूर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, निवडणूक आयोगाने यावेळी उमेदवारांसाठी एक अत्यंत आगळावेगळा 'नियम' लागू केला आहे. आता केवळ प्रतिज्ञापत्र देऊन चालणार नाही, तर प्रत्येक उमेदवाराला 'शहराचा विकास कसा करणार?' या विषयावर स्वतःच्या हस्ताक्षरात निबंध लिहावा लागणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
निबंधाचे स्वरूप आणि महत्त्वाचे मुद्दे
उमेदवारी अर्जाच्या संचामध्ये निबंधासाठी शेवटचे पान राखीव ठेवण्यात आले असून, उमेदवारांना १५० ते ५०० शब्दांत आपले विचार मांडावे लागतील. या निबंधात मुख्य दोन पैलू असणे आवश्यक आहे: पहिले म्हणजे सत्तेत आल्यावर कोणत्याही गैरव्यवहारात किंवा भ्रष्टाचारात सहभागी न होण्याचे लेखी आश्वासन, आणि दुसरे म्हणजे प्रभागाच्या विकासाचा नेमका आराखडा. यामुळे उमेदवारांच्या व्हिजनची मतदारांना स्पष्ट कल्पना येऊ शकेल.
Raigad Crime: शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांसमोर मोठे संकट
आयोगाच्या या नवीन गुगलीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून इच्छुकांची चांगलीच धांदल उडाली आहे. विशेषतः ज्या उमेदवारांचे शिक्षण कमी आहे किंवा ज्यांना लिहिण्याची सवय नाही, त्यांच्यासमोर हे मोठे आव्हान ठरत आहे. "आम्ही मैदानात भाषणे ठोकू शकतो, पण निबंध कसा लिहिणार?" असा सूर काही उमेदवारांकडून उमटत आहे. ज्यांना लिहिता येत नाही, त्यांना 'लेखनिक' किंवा मदतनीस घेता येईल का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात, पण अर्ज दाखल शून्य
लातूर महापालिकेसाठी आतापर्यंत ५१३ अर्जांची विक्री झाली असली, तरी अद्याप एकाही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला नाही. या निबंधाच्या अटीमुळेच ही दिरंगाई होत असल्याचे बोलले जात आहे. अर्जासोबत जोडलेले हे 'निबंध' वाचणे प्रशासन आणि मतदार या दोघांसाठीही उत्सुकतेचे ठरणार आहे. हा नियम केवळ एक प्रशासकीय सोपस्कार ठरणार की खरोखरच लोकशाहीत गुणात्मक बदल घडवून आणणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
IndiGo ची संभाजीनगर-हैदराबाद विमानसेवा मार्चपर्यंत बंद; प्रवाशांमध्ये तीव्र संताप