Latur Crime News: माणुसकीला काळीमा फासणारी एक अमानुष घटना लातूरच्या श्यामनगर परिसरात उघडकीस आली आहे. अवघ्या दीड वर्षांच्या नंदिनी नावाच्या चिमुरडीची तिच्याच जन्मदात्या आईने हत्या केली आहे. अश्विनी चौगुले असे या आरोपी महिलेचे नाव असून, ही घटना 19 जानेवारीच्या सकाळी घडली. या घटनेने केवळ लातूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी ती मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल दिल्यानंतर न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वादाचे रूपांतर हत्येत
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अश्विनी आणि तिचे पती यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला होता. पती उशिरा घरी आल्याच्या रागातून अश्विनीने रागाच्या भरात नंदिनीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब मूळचे हासेगाव येथील असून रोजगारासाठी लातुरात वास्तव्यास होते.
मानसिक तपासणीत मोठा खुलासा
घटनेनंतर पोलिसांनी अश्विनीला तात्काळ ताब्यात घेतले. तिने हे कृत्य मानसिक आजारातून केले असावे असा संशय होता. मात्र मानसोपचार तज्ज्ञांनी सुमारे 30 तास तिचे निरीक्षण केले. ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असून तिला कोणताही मानसिक आजार नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. केवळ रागाच्या भरात तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाल्यावर न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
4 वर्षांच्या मुलावर गंभीर परिणाम
घटनेच्या वेळी घरात चार वर्षांचा मोठा मुलगाही उपस्थित होता. आपल्या डोळ्यादेखत आईने बहिणीला संपवल्याचे पाहिल्यामुळे या लहानग्यावर गंभीर मानसिक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सामाजिक संस्थांकडून या मुलाचे समुपदेशन करण्याची गरज व्यक्त होत आहे.