त्रिशरण मोहगावकर, लातूर
Latur News: लातुरच्या जळकोट तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली असून, तिरू नदीमधील पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यामुळे मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. धक्कादायक म्हणजे या दोन ते तिन महिन्यात पुरामध्ये वाहून गेल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , जळकोट तालुक्यातील मर सांगवी येथील कौशल्या अजय वाघमारे (वय ३५) व रुक्मिणी अजय वाघमारे (वय १४) या दोघी मायलेकी मरसांगवी येथीलच मरीबा वाघमारे यांच्या शेतामधील कापूस वेचण्यासाठी मजुरीने जात होत्या. कापूस वेचण्यासाठीचे शेत नदीपलीकडे होते. शेताकडे जात असताना नदीमध्ये पाणी कमीच होते.
मात्र तिरू नदीमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे या दोघीही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्या व दुर्दैवी या दोघींचाही मृत्यू झाला . सदरील मायलेकी वाहून गेल्याची माहिती मिळताच गावातील काही जन नदीपात्रात धावले व मायलेकीला काढण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला होता. मायलेकीचा एकाच वेळी दुर्दैव मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मरसांगवी गावाच्या वरच्या बाजूकडून तिरू प्रकल्प आहे . हा तिरू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे . दररोज या तिरू प्रकल्पाचे गेट उघडून पाणी नदीपत्रात सोडले जात आहे . अचानक तिरू नदीपत्रातून पाणी सोडण्यात आले . व मरसांगवी येथे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला, तसेच पाण्याचा वेग देखील वाढला . यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघीही मायलेकीच्या मृत्यू झाला असल्याची माहिती येथील सरपंच रवी गोरखे व चेअरमन उमाकांत इमडे यांनी दिली .
अनेक दिवसांपासून होत आहे पुलाची मागणी
मर सांगवी हे गाव तिरू नदी काठावर आहे. तसेच तिरुनिदीला महापूर आल्यानंतर या गावांमध्ये देखील महापुराचे पाणी शिरते. अनेक वेळा गावातील नागरिकांना माळावर जाऊन बसावे लागले होते. या गावातील नागरिकांना नदीच्या पात्राच्या पलीकडे असलेल्या शेताकडे जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो . आता यावर्षी तर सतत नदीपात्रातून पाणी वाहत आहे यामुळे शेतक-यांची शेताकडे जाणे बंदच झाले आहे.
अनेक वेळा नदीपात्रातून पुढे शेताकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या ठिकाणी पुल उभा करावा अशी मागणी गावक-यांनी केली होती. अनेक राजकीय तसेच विविध अधिका-यांनी या गावाला भेटी देऊन या ठिकाणाची पाहणी केली होती . यावेळी गावक-यांनी पूल उभा करावा अशी मागणी केली होती . परंतु पूल उभा करण्यात आला नाही, जर या ठिकाणी पूल असता तर या दोघींचा जीव वाचला असता अशी देखील चर्चा सध्या गावात सुरू आहे.
पुरामुळे दोन महिन्यात सहा जणांचा मृत्यू
जळकोट तालुक्यात या वर्षी अतिवृष्टीने कहर केला, यामुळे अनेक नद्यांना पुर आला. तालुक्यात या दोन ते तिन महिन्यात पुरामध्ये वाहून गेल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यास कमी उंचीचे पुल तसेच पुल नसणे हे प्रमुख कारण आहे. या पुरामुळे माळहिप्परगा येथील शान सुर्यवंशी व वैभव गायकवाड दोघेजण वाहून गेले होते तसेच तिरुका येथील सुदर्शन घोनशेट्टे हा वाहून गेला होता व या तिघांचा पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. तसेच तालुक्यातील ढोरसांगवी येथील बालाजी पोतने हे शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले होते . तर आता मरसांगवी येथील दोघी माय लेकीचा मृत्यू झाला आहे .