OBC Reservation लक्ष्मण हाकेंना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, तक्रारीनंतर मिळाले पोलीस संरक्षण

हाके यांनी आरोप केला होता की महाराष्ट्रात दीडशे ठिकाणी ओबीसी समाजातील लोकांवर मराठा आंदोलकांनी हल्ले केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
लक्ष्मण हाके यांना पोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
पुणे:

राहुल कुलकर्णी

मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये असा आग्रह धरत उपोषणे आंदोलने करणाऱ्या लक्ष्मण हाके यांना अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली जात आहे. हाके यांना सातत्याने शिवीगाळ करणारे फोन येऊ लागले असून शिवीगाळ करणाऱ्यांनी हाकेंच्या कुटुंबियांनाही शिव्या देण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यामुळे उद्वीग्न झालेल्या हाके यांनी महिनाभरापूर्वी पुणे पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रार करतेवेळी हाके यांनी 17 जणांची एक यादी दिली असून यामध्ये धमकी देणाऱ्यांची नावे आणि त्यांचे फोन नंबर देण्यात आले आहेत. सोलापूर आणि मराठवाड्यातून आपल्याला धमक्या येत असल्याचे हाके यांनी म्हटले होते. 

नक्की वाचा : ओबीसींचा नवा चेहरा,कोण आहेत लक्ष्मण हाके? 

तक्रारीनंतर हाकेंना मिळाले पोलीस संरक्षण

लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मराठा आंदोकांकडून ओबीसी समाजातील लोकांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली म्हणून बीड जिल्ह्यातील एका गावामध्ये एका व्यक्तीला नाक घासून जरांगे पाटील यांची माफी मागायला लावली होती. हाके यांनी आरोप केला होता की महाराष्ट्रात दीडशे ठिकाणी ओबीसी समाजातील लोकांवर मराठा आंदोलकांनी हल्ले केले आहेत. यातल्या चार घटना या बीड जिल्ह्यातल्या असल्याचं हाके यांचे म्हणणे आहे. हाके यांनी धमक्या येऊ लागल्यानंतर पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर त्यांना 24 तास पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मराठ्यांना सगेसोऱ्यांसह ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या प्रश्नावर उपोषणही केलं होतं. त्यानंतर सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारसोबत बैठक घेत त्यांच्या मागण्या सादर केल्या होत्या. या बैठकीनंतर हाके यांची NDTV मराठीने मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये हाके यांनी म्हटले होते की, सरकार आणि विरोधीपक्ष वस्तूस्थितीपासून पळ काढत आहेत. ओबीसींसाठीचा राजकीय अॅप्रोच चुकतोय. त्यामुळे मराठा समाजाची झुंडशाही सुरु आहे.' सरकारच्या निर्णयानंतर मराठा आणि ओबीसी एक झाले तर मागासलेपणाचे काय करायचे? मराठा समाज कोणत्या सेक्टरमध्ये मागसलेला आहे.की त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या पाचपट प्रतिनिधित्व त्यांना मिळतं?असा सवालही हाके यांनी केला होता.