Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चाकरमान्यांनी कोकणात जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यंदा गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट रोजी आहे. गणेशोत्सव महिनाअखेरीस आल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना पाच दिवस आधीच पगार दिला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्य सरकारने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आता एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employees) देखील पुढील महिन्याचा पगार गणेश चतुर्थी आधी मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले आहेत. आजच्या आज वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाइल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याचसोबत वित्त विभागात देखील बोलणी करून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा निधी एक ते दोन दिवसात हस्तांतरित करण्याची विनंती आहे.
नक्की वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार गणेशोत्सव सुरू होण्याच्या आधीच मिळणार
जर वित्त विभागाकडून सोमवारपर्यंत निधी आला तर सोमवारी किंवा मंगळवारीच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होणार, अशी सूत्रांची माहिती आहे. दर महिन्यात उशिरा पगार मिळणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना या महिन्यात तरी गणपती बाप्पामुळे पगार लवकर मिळणार असल्याची शक्यता आहे. 26 ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याचे पगार होणार आहेत. कदाचित त्यापूर्वी म्हणजेच सोमवारीही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.