Lionel Messi Mumbai Event Traffic Changes: जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. आज मेस्सी मुंबईमध्ये येणार असून त्याला पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मुंबईतील या कार्यक्रमाच्या दौऱ्यावर शहरातील वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती आणि नियोजनाविषयी माहिती दिली आहे.
मेस्सीच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः चर्चगेट आणि मरीन ड्राईव्ह परिसरातील अनेक महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत, तसेच पार्किंगवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रवाशांनी गैरसोयीपासून वाचण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. वानखेडे आणि ब्रेबॉन स्टेडियम परिसरात पार्किंगची कोणतीही सोय उपलब्ध नसून, खालील रस्त्यांवर पार्किंग निर्बंध लागू असतील.
VIDEO: मेस्सीच्या चाहत्यांचा तुफान राडा! मैदानात घुसले, बाटल्या अन् खुर्च्या फेकत गोंधळ; कारण काय?
या रस्त्यांवर पार्किंगला बंदी:
- सी रोड, डी रोड, ई रोड, एफ रोड आणि जी रोड.
- एन.एस. रोड (दोन्ही दिशांना), वीर नरीमन रोड, दिनशॉ वाच्छा रोड आणि जमशेटजी टाटा रोड.
- वीर नरीमन रोड आणि दिनशॉ वाच्छा रोडवरील 'पे-अँड-पार्क' सुविधाही तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आल्या आहेत.
वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते आणि बदल:
गर्दीच्या व्यवस्थापनासाठी काही रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे:
नेताजी सुभाष रोड (उत्तरवाहिनी): एअर इंडिया जंक्शन ते माफतलाल जंक्शनपर्यंत बंद.
कोस्टल रोड (दक्षिणवाहिनी): वरळी/तारदेव येथून मरीन ड्राईव्हकडे येणारी वाहतूक थांबवली जाईल.
कोस्टल रोड (उत्तरवाहिनी): मरीन ड्राईव्ह ते वरळी/तारदेवकडे जाणारी वाहतूक थांबवली जाईल.
डी रोड (पश्चिम ते पूर्व): एन.एस. रोड ते ई आणि सी रोड जंक्शनकडे जाणारा रस्ता.
ई रोड (दक्षिणवाहिनी): डी रोड ते सी रोड जंक्शनकडे जाणारा रस्ता.
वीर नरीमन रोड (दक्षिणवाहिनी): चर्चगेट जंक्शन ते ई रोडपर्यंत मर्यादित प्रवेश.
पर्यायी मार्ग कोणते?
या वाहतूक बदलांमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी पर्यायी मार्गांची सूचना केली आहे. प्रवाशांनी रामनाथ पोद्दार चौक (मेट्रो सिनेमाजवळ), महर्षी कर्वे रोड, ओपेरा हाऊस, चर्नी रोड आणि मरीन लाईन्स या मार्गांचा वापर करावा. तसेच, रेल्वे आणि मेट्रो सेवांचा वापर करणे अधिक सोयीचे ठरेल. दक्षिण मुंबईत महत्त्वाचे काम नसलेल्या नागरिकांनी या वेळेत प्रवास करणे टाळावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीची शक्यता पाहता, नागरिकांनी वेळेचं नियोजन करून घराबाहेर पडावं.