नाशिक: पुरातत्व विभागाकडून आलेले पत्र तसेच माजी विश्वस्तांच्या आक्षेपानंतरही महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कार्यक्रम घेणार ठाम आहे. आज (बुधवार, ता. 26) सर्व नियमांचे पालन करूनच त्र्यंबकेश्वर मंदिरात प्राजक्ता माळी यांच्या नृत्याचा कार्यक्रम होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पणनस्तु नृत्याचे सादरीकरण मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार सादर करणार आहेत. या कार्यक्रमावर मंदिराच्या माजी विश्वस्त तसेच सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी आक्षेप घेतला होता.
तसेच पुरातत्व विभागानेही प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर आक्षेप घेत मंदिर समितीला पत्र पाठवले होते. मात्र यानंतरही मंदिर प्रशासन हा कार्यक्रम घेणार ठाम आहे. - सर्व नियमांचे पालन करूनच त्र्यंबकेश्वर मंदिरात प्राजक्ता माळी यांच्या नृत्याचा कार्यक्रम होईल, असे मंदिराच्या विश्वस्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात नृत्य, धार्मिक, संस्कृतिक कार्यक्रम होत आहेत नटरंग अकादमीने विनंती केल्याने यंदा त्यांच्या शिवार्पणमस्तू या कार्यक्रमाच आयोजन केले आहे. प्राजक्ता माळी यांच्या खासगी आयुष्याशी देवस्थानला काहीही देणं घेणं नाही, असे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आज रात्री ८ वाजता पुण्याच्या नटरंग अकॅडमीतर्फे शिवार्पणमस्तू हा नृत्याचा कार्यक्रम करण्यात सादर होणार असून यामध्ये इतर कलाकारांसोबतच प्राजक्ता माळी देखील नृत्य सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.