राहुल तपासे
सध्या पावसाचा काही भागात जोर आहे. महाबळेश्वर पट्ट्यातही चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना ही होत आहेत. त्यात महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील एमपीजी क्लबजवळ रस्ता खचला आहे. याचा फटका थेट तापोळा विभागातील गावांना बसला आहे. हा रस्ता खचल्यामुळे जवळपास 105 गावांचा संपर्क धोक्यात आला आहे. अशा स्थितीत या गावांना पर्यायी रस्ता दिला जावा ही मागणी जोर धरू लागली आहे.
या गंभीर प्रश्नावर शिवसेना शहरप्रमुख विजय (भाऊ) नायडू यांनी महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. रस्ता बंद असल्याने एसटी सेवा ठप्प झाली आहे. खासगी वाहनांचीही वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत आहे. एखादा गंभीर रुग्ण वेळेत उपचारासाठी हलवणे कठीण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
भुईमिया यांच्या बंगल्यालगतच्या जागेतून तात्पुरता पर्यायी मार्ग सुरू करावा अशी मागणी होत आहे. किंवा आवश्यक असल्यास कंपाउंड हटवून नवीन मार्ग तयार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पावसाळ्यात कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पर्यायी रस्ता सुरू करावा, अशी जोरदार मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. प्रशासन आता यावर काय उपाययोजना करतं याकडे लक्ष लागलं आहे. पण ही उपाय योजना तातडीने व्हावी अशी मागणी होत आहे.
अनेक वेळा सरकारी काम आणि दहा महिने थांब असा अनुभव प्रत्येकालाच येत असतो. पण या स्थिती ताडीने काम होणे गरजेचे आहे. कारण 105 गावांचा प्रश्न आहे. शिवाय येणाऱ्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे येणारा धोका लक्षात घेता प्रशासनाने पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे गरजेचे आहे असं ही या निवेदनात म्हटले आहे. जर पर्यायी रस्ता झाला तर या 105 गावातल्या गावकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.