विशाल पुजारी, प्रतिनिधी
Kolhapur News : शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात गुजरातला रवाना करण्यात आलं. मिरवणूक काढून भावनिक होत ग्रामस्थांनी महादेवीला निरोप दिला. दरम्यान मिरवणुकीच्या शेवटी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीमुळं पोलिसांनी लाठीचार्ज केला. हत्तीला गावातून नेण्याला विरोध असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणत अॅनिमल अॅम्ब्युलन्समधून हत्तीणीला रवाना करण्यात आलं. या सगळ्या मिरवणुकीदरम्यान नांदणीकराना अश्रू अनावर झाले होते.
नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्याकडे ही हत्तीण होती. महादेवी असं या हत्तीणीच नाव आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय देताना, प्राण्यांचा गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं. त्यानंतर नांदणी येथील हत्तीणीला गुजरातच्या वनतारा याठिकाणी रवाना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे समजल्यानंतर ग्रामस्थांनी या हत्तीणीला नेऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर 28 जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात तिला गुजरातला नेण्यात आलं आहे.
नक्की वाचा - Sangli News : सुलतान-राम्याने मारलं मैदान, ऐतिहासिक देवभाऊ केसरी बैलगाडाचे ठरले पहिले मानकरी
ग्रामस्थांनी या हत्तीला मठातून घेऊन जाण्यास विरोध केलेला होता. गावात हत्तीणीला नेण्यासाठी विरोध करत मोठा मोर्चा देखील काढण्यात आलेला. तसेच सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात धाव घेतलेली मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्यानंतर हा हत्ती गुजरातच्या वनताराकडे रवाना करण्यात आला आहे. निरोप देताना कायद्याच्या विरोधी भूमिका घेणार असं म्हणत गावाकऱ्यांनी अखेर अॅनिमल अॅम्ब्युलन्सपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढत सोडलं. शेवटी काहींना भावना अनावर झाल्या. काही पोलीस वाहनावर दगदफेक केल्यानंतर पोलिसानी सौम्य लाठीचार्ज देखील केला आणि हत्तीणीला गुजरातला रवाना करण्यात आलं.
गेली अनेक वर्ष ही हत्तीण नांदणीच्या मठात होती. गावातील लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हिचा लळा होता. या हत्तीणीला निरोप देताना सगळ्यांना अश्रू अनावर झाले होते. जिनसेन भट्टाचारक महाराज यांच्या डोळ्यातही अश्रूधारा होत्या. तळहातांच्या फोडाप्रमाणे या हत्तीणीचा सांभाळ केला होता. म्हणूनच गावाकऱ्यांनी या महादेवी हत्तीणीला नेण्याला विरोध केला.
रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून चालवले जाणारे वनतारा वाईल्ड लाईफ रेस्क्यू अँड रिहाबिलेशन सेंटर हे प्राणी काळजी केंद्र मानले जाते. 3,500 एकर भूभागात पसरलेले हे केंद्र 3,300 प्रजातींतील सुमारे 10,000 प्राण्यांचे निवारा घर आहे. विविध प्राणी या संग्रहलयात आहेत. या प्राण्यांसाठी आरोग्यविषयक आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याच वनकेंद्रात आता नांदणीतील महादेवी हत्तीण देखील असणार आहे.