Education News: राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे 11 वीच्या ऑनलाइन प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने 'अंतिम विशेष फेरी' जाहीर केली आहे. 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर 2025 या तीन दिवसांत विद्यार्थी नवीन नोंदणीसह आपले प्राधान्यक्रम (Preferences) अद्ययावत करू शकतील. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे की, प्रवेशाची ही शेवटची संधी आहे. या फेरीचे अलॉटमेंट 7 ऑक्टोबर २०२५ नंतर जाहीर होणाऱ्या वेळापत्रकानुसार केले जाईल
कशी असेल विशेष फेरी?
शैक्षणिक वर्ष 2025-२६ पासून राज्यात ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. या विशेष अंतिम फेरीपूर्वी, प्रवेश प्रक्रियेच्या आतापर्यंत एकूण 10 फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. या सर्व फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या, तसेच नवीन नोंदणी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विशेष फेरीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज अद्ययावत करण्याची आणि प्राधान्यक्रम (Preferences) भरण्याची अंतिम वेळ दिली जात आहे, ज्यामुळे एकही पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये.
ही अंतिम फेरी कशी असेल त्याबाबत सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार...
4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर 2025 दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत विद्यार्थी नवीन नोंदणीसह प्राधान्यक्रम भरू शकतील, तसेच जुन्या प्राधान्यक्रमात बदलही करता येईल. या फेरीमध्ये अर्ज भरताना विकल्प (Option) भरण्याची आणि नोंदणीची सुविधा देण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालय मिळाले नाही, केवळ अशाच विद्यार्थ्यांना रिक्त जागा दर्शवून, रिक्त जागांचा विचार करून विकल्पात बदल करण्याची सुविधा पुन्हा देण्यात येणार आहे.
( नक्की वाचा : Kaun Banega Crorepati 'साहेब मी शेतकरी!' म्हणत KBC गाजवलं, संभाजीनगरच्या कुंटेवारांनी 50 लाख कसे जिंकले? वाचा )
या बदललेल्या विकल्पानुसार त्यांना गुणानुक्रमे महाविद्यालय देण्यात येईल. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांनी विकल्प नोंदविला नाही, त्यांना अलॉटमेंटच्या स्तरावर गुणानुक्रमे महाविद्यालयाचे वाटप (Allotment) केले जाणार नाही.
ही ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी असून, यानंतर प्रवेशासाठी कोणतीही संधी मिळणार नाही, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. उपरोक्त टप्पे पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळी गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची अलॉटमेंट केली जाईल.
महाविद्यालयाचे वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना 7 ऑक्टोबर 2025 नंतर जाहीर होणाऱ्या वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे. अलॉटमेंटच्या टप्प्यावर महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा विकल्प भरता येणार नाही.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाचे अधिकृत पोर्टल https://mahafyjcadmissions.in ला भेट द्यावी अथवा ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in किंवा हेल्पलाईन नंबर 8530955564 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.