राज्याच्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरुन महायुतीममध्ये चांगलाच कलह पाहायला मिळाला. नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली होती. भाजपच्या विरोधानंतरही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना उमेदवारी दिली. भाजपच्या नवाब मलिकांवरील आरोपांवर आता अजित पवार यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार?
"एखाद्यावर आरोप झाले आणि ते आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्या व्यक्तीने त्याची किंमत का मोजावी? आरोप सिद्ध झाल्यानंतर पक्षाकडून काही चूक झाली असेल तर ती चूक म्हणावी.देश स्वतंत्र झाल्यापासून अनेक नेत्यांवर आरोप होत आहेत.आरोप सिद्ध झाल्यावर त्यांना बाजूला करण्यात आले.ज्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री,मंत्री अशी वेगवेगळी पदे भूषवली, असं अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच नवाब मलिक हे आमच्या पक्षाचे उमेदवार असल्याने त्यांच्या प्रचाराला नक्की जाणार आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांनाही उत्तर दिले. मी त्यांना ३५ वर्षांपासून ओळखतो.अनेक सेलिब्रेटींवरही असे आरोप झाले. मात्र जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत एखाद्याला दोषी ठरवणे चुकीचे आहे. भाजप नेत्यांना जे योग्य वाटते ते ते बोलतात...असंही अजित पवार म्हणाले.
नक्की वाचा: बंडखोरांना दणका! राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट निलंबनाची कारवाई; कोण आहेत 'ते' ८ नेते?
दरम्यान, महायुतीमध्ये नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलह पाहायला मिळत होता. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपने जोरदार विरोध केला होता तसेच भारतीय जनता पक्ष त्यांचा प्रचार करणार नाही असेही आशिष शेलार यांनी स्पष्ट केले होते. मात्र भाजपचा विरोध डावलून नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
ट्रेंडिग बातमी: 'एकाच घरातले दोघे , एक एकीकडे दुसरा तुतारीकडे,राज यांचा टोला कोणाला?