मुंबई: तुळजापूर, परंडासह धाराशिव जिल्ह्यामधील ड्रग्ज प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरच कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी दाखल केली होती. मात्र विधिमंडळ पटलावर सरकारने उत्तर देण्याआधीच हा अहवाल सोशल मीडियावर लीक झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे कैलास पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत हा गोपनियतेचा भंग असल्याचा आरोप केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले कैलास पाटील?
तुळजापूरसह ग्रामीण भागात ड्रग्स माफियानी जो उच्छाद मांडला आहे, तो पूर्णतः मोडून काढणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने आपण कार्यवाही संदर्भातील तपशील अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात आधीपासूनच काही लोकांना पोलिस पाठीशी घालत असल्याचा संशय या भागातील नागरिकांना आहे. आज जो प्रकार समोर आला त्यातून संशयाला पुष्टी मिळत आहे.
आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पोलिसांनी तयार केले ते वास्तवात ज्या दिवशी लक्षवेधी लागते त्याच दिवशी समोर यायला हवे. मात्र, त्याच्या आधीच हे उत्तर एका व्हॉट्स ॲप ग्रुपवर लीक केले गेले. पोलिसांकडून हे उत्तर बाहेर गेलेच कसे ? याद्वारे गुन्हेगारांना आधीच सतर्क करण्याचा प्रयत्न झालाय का? अशी शंका निर्माण होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांकडे असलेल्या गृह विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत आपल्याच विभागाचे कसे धिंडवडे काढले जात आहे, हे आपण पाहत आहात का? या परिस्थितीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे का, की सरकारच गुंड आणि माफियांना पाठबळ देत आहे? असा सवाल कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नक्की वाचा - Shirdi News: शिर्डीच्या साईमंदिर परिसरातील कुत्रे का होतायत लठ्ठ? मोठं कारण आलं समोर
दरम्यान, ही लक्षवेधी चर्चेला यायच्या आधीच गृहविभागाचे उत्तर एका व्हॉटसअप ग्रुपवर गेलं. ते कसं लीक झालं ? इथे सदस्यांना लक्षवेधी कार्यक्रम पत्रिकेवर आल्यानंतरही उत्तर मिळत नाही, ते मागून घ्यावे लागते. लक्षवेधी लागायची आहे, मात्र उत्तर लीक झालं. याची चौकशी होणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही कैलास पाटील यांनी केली आहे. यावर ज्या विभागाकडे ही लक्षवेधी होती, तिथून ती परस्पर खाली गेली असेल तर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.