सुनील दवंगे, प्रतिनिधी
साईबाबांची नगरी शिर्डी नेहमीच भाविकांनी गजबजलेली असते. येथे आलेला भाविक साईंच्या श्रद्धेनं भावनिक झालेला दिसून येतो. याच श्रद्धेपोटी भाविक येथिल कुत्र्यांना मायेनं प्रसादातील गोड पदार्थ खावू घालतात. मात्र हीच माया आता कुत्र्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरताना दिसून येतय. शिर्डीतील साई मंदिर परिसरातील कुत्रे लठ्ठ होताना दिसत आहे. त्या मागचे कारण आता समोर आले आहे. त्यामुळे प्राणी प्रेमींमध्ये आता एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
साईबाबांची शिर्डी जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून परिचित आहे. येथे देशातूनच नव्हे तर विदेशातून वर्षाकाठी साडेतीन कोटी पेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात. मुळातच साईबाबांनी आपल्या हयातीत मुक्या प्राण्यांची सेवा केली आहे. भिक्षेत मिळणारं अन्न ते पक्षीप्राण्यांबरोबर वाटून खात होते. याच भावनेमुळे भाविक देखील येथे आल्यानंतर दानधर्म करताना दिसून येतात. त्यात भावीक आपल्याकडील प्रसाद इथल्या कुत्र्यांना खावू घालतात. अलिकडे शिर्डीतील मंदिर परिसरातील कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लठ्ठपणा दिसून येत आहे.
ट्रेंडिंग बातमी - Big news: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन, दिलं 'हे' कारण
ऐरवी शेतातील आणि पाळीव कुत्र्यांचं शरीर हे सडपातळ आणि कणखर असते. मात्र इथले कुत्रे कमालीचे लठ्ठ, सुस्तावलेले, आणि त्वचारोगांनं ग्रासलेले दिसून येतात. शिर्डीला साई मंदिरातून बाहेर पडताना भाविकांना मोफत बुंदी प्रसाद वितरीत केला जातो. भाविक येथे बसून तो प्रसाद खातात. अशा वेळी कुत्रा जवळ आला की त्याला ही हा गोड बुंदीचा प्रसाद खावू घालतात. तसेच मंदिर परिसराबाहेर पेढे, खडीसाखर असे अति गोड पदार्थ कुत्र्यांना दिले जातात. महत्वाचं म्हणजे दिवसभर हे सुरु असतं. त्यामुळे अनावश्यक साखर कुत्र्यांच्या पोटात जावून ते लठ्ठ झाल्याचं दिसून येत आहेत.
पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते दिवसभरात भाविक बदलत असतात. मात्र कुत्रे तेच असल्यानं ते अतिगोड पदार्थ त्यांच्या पोटात जातात. नेहमीच गोड पदार्थ खाल्ल्यानं त्यांना फक्त लठ्ठपणाच नाही तर अनेक आजार होवून त्याचे जीवनमान देखिल कमी होते. भाविक श्रद्धेन बूंदी, पेढे कुत्र्यांना देतात मात्र हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे, असं डॉक्टर सांगतात. शिर्डीतील व्यावसायीक ही वाढत्या कुत्र्यांच्या संख्येनं त्रस्त आहेत. बाहेरील गावातून येथे कुत्रे आणून सोडले जातात. नंतर ह्या कुत्र्यांना पेढे बुंदी अशी गोड पदार्थांची लत लागते.
शिर्डीत तशी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र मंदिर परिसर, चावडी, व्दारकामाई, सभामंडप, लाडू विक्री केंद्र, मोफत बुंदी प्रसाद वितरण कक्ष अशा ठिकाणी जवळपास शंभरहून आधिक कुत्रे दिसून येतात. यातील असंख्य कुत्रे गजबलेल्या ठिकाणी देखील सुस्तावलेले पाहायला मिळतात. प्रशासन शिर्डीत कुत्र्यांना गोड पदार्थ देवू नयेत असे फलक लावणं महत्वाचं आहे. त्याच बरोबर त्यांची आरोग्य तपासणी करत उपाययोजना करव्यात अशी देखील मागणी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world