Ajit Pawar : अजित पवारांचे अधुरे स्वप्न फडणवीस पूर्ण करणार; बारामती, इंदापूरसह राज्यासाठी मंत्रिमंडळाचे गिफ्ट

Maharashtra Cabinet Decisions: राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अजित पवार यांनी काही महत्त्वाच्या प्रकल्पांचा आणि प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा केला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
Maharashtra Cabinet Decisions: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी सुचवलेल्या 3 अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांवर मोहोर उमटवली आहे.
मुंबई:

Maharashtra Cabinet Decisions: अजित पवार यांच्या निधनानंतर आज (मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026) पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.  राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अजित पवार यांनी काही महत्त्वाच्या प्रकल्पांचा आणि प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अपघाती निधनानंतर आज झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी सुचवलेल्या 3 अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांवर मोहोर उमटवली आहे. आपल्या सहकाऱ्याने पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकारने हे पाऊल उचलले असून, यामध्ये बारामतीचे क्रीडा संकुल, इंदापूरची MIDC आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा समावेश आहे.

बारामतीमध्ये जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल उभारणार

अजित पवार यांचा बारामतीच्या विकासाकडे नेहमीच विशेष ओढा राहिला आहे. त्यांच्या आग्रहाखातर बारामती जिल्ह्यातील कटफळ येथे 75 कोटी 13 लाख रुपयांच्या क्रीडा सुविधांना राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. साधारण 80 हजार चौरस मीटर जागेवर हे भव्य संकुल उभे राहणार आहे. यामध्ये आधुनिक पॅव्हेलियन, ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी रेंज आणि बास्केटबॉल मैदानासारख्या सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. खेळाडूंना हक्काचे आणि दर्जेदार मैदान मिळावे, हा अजित पवारांचा मानस या निर्णयामुळे आता पूर्ण होणार आहे.

( नक्की वाचा : Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचे अपघाती निधनाबद्दल 5 मोठे प्रश्न, रोहित पवारांनी मागितली उत्तरं )

इंदापूरच्या रत्नपुरी मळ्यातील MIDC चा मार्ग मोकळा

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील रत्नपुरी मळा येथे नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. आजच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची 1000 एकर जमीन या नवीन MIDC साठी हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली. 

या निर्णयामुळे इंदापूर आणि वालचंदनगर परिसरातील तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील आणि परकीय गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे.

( नक्की वाचा : Pune News: आता थेट उड्डाणपुलावरून धावणार पुणे मेट्रो; नगर रोडचा प्रवास होणार सुसाट! वाचा सर्व माहिती )
 

 11 अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती

राज्याचा महसूल विभाग अधिक सक्षम व्हावा आणि नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत, यासाठी अजित पवार यांनी महसूल मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. भौगोलिक क्षेत्रफळ आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी पदांच्या निर्मितीला आज मंजुरी देण्यात आली. निधनापूर्वी काही दिवस आधीच अजित पवारांनी या प्रस्तावावर चर्चा केली होती. प्रशासकीय सुसूत्रता आणणारा हा निर्णय त्यांच्याच नियोजनाचा एक भाग मानला जात आहे.

Advertisement

इतर महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय

आजच्या बैठकीत केवळ हे तीनच निर्णय झाले नाहीत, तर राज्याच्या हिताचे इतरही अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी 12 हेक्टर 76 आर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळाच्या कामाला गती देण्यासाठी 6000 कोटी रुपयांच्या कर्जाला शासन हमी देण्यात आली आहे.

आरोग्य आणि सिंचन क्षेत्रासाठी मोठी तरतूद

ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यासाठी माझं गाव, आरोग्य संपन्न गाव हे नवीन अभियान राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी दरवर्षी 80 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद केली जाईल. सिंचनासाठी 15000 कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यासही मान्यता मिळाली असून, यामुळे राज्यातील ८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. याशिवाय, ई-मेलद्वारे पाठवलेली नोटीस आता कायदेशीर मानली जाईल, असा महत्त्वपूर्ण बदल जमीन महसूल अधिनियमात करण्यात आला आहे.

Advertisement