Lek Ladki Yojana : राज्य सरकार मुलींना करणार 1 लाख 1 हजारांची मदत, कसा मिळणार फायदा? वाचा संपूर्ण प्रोसेस

जाहिरात
Read Time: 3 mins
Lek Ladki Yojana : राज्य सरकारच्या लेक लाडकी योजनेची माहिती अनेकांना नाही. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Maharashtra Lek Ladki Yojana : राज्यात सध्या सगळीकडं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. राज्य सरकारकडून या योजनेचा सध्या जोरदार प्रचार केला जात आहे. त्यामुळे साहजिक यासाठी अनेक महिलांनी अर्ज भरले आहेत. या योजनेनुसार लाभार्थी महिलांना दर महिना 1500 रुपये मिळणार आहेत. त्याचवेळी मुलींच्या मदतीसाठी राज्य सरकारनं लेक लाडकी योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार लाभार्थी मुलींना तब्बल 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारच्या या योजनेची अनेकांना माहिती नाही. आम्ही तुम्हाला या योजनेचे सर्व निकष सांगणार आहोत. ही माहिती झाल्यानंतर लाभार्थी मुलींसाठी अर्ज नक्की भरा आणि सरकारच्या योजनेचा फायदा घ्या.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे योजनेचा उद्देश?

राज्यातील अनेक मुलींचं शिक्षण पैशांच्या अभावी पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांचं लवकर लग्न लावलं जातं. या प्रश्नावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं  'लेक लाडकी' योजना सुरु केली आहे. राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.

Advertisement

कसे मिळणार पैसे?

या योजनेनुसार मुलीचा जन्म झाल्यावर 5000 रुपयांची मदत दिली जाईल. मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर 4000 रुपयांची मदत सरकारकडून मिळेल. ती सहावीमध्ये गेल्यानंतर 6000 रुपये, अकरावीमघ्ये गेल्यानंतर 8000 रुपये दिले जातील. मुलीचं वय 18 पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून 75,000 रुपयांची मदत मिळेल. या प्रकारे मुलीला एकूण 1,01,000 (एक लाख एक हजार रुपये ) मदत मिळेल. 

Advertisement

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )
 

कुणाला मिळणार फायदा?

- 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू असेल.
- लाभार्थी कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला योजनेचा फायदा मिळेल
- दुसऱ्या अपत्याच्या प्रसुतीदरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झाल्यास त्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल. मात्र त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांपैकी एकानं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी या योजनेचा अर्ज सादर करताना आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. 
- ही योजना फक्त महाराष्ट्राच्या रहिवाशांसाठीच लागू आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे.

( नक्की वाचा : Lakhpati Didi Scheme : महिलांचं भाग्य बदलणारी 'लखपती दीदी' योजना काय आहे? कसा करणार अर्ज? )
 

कोणती कागदपत्र आवश्यक?

- कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला
- लाभार्थीचा जन्म दाखला
- लाभार्थीचे आधार कार्ड (पहिल्यांदा लाभ मिळवताना ही अट लागू नसेल)
- पालकाचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
- दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्यासाठी शिक्षण घेत असलेला दाखला
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- शेवटचा हप्ता घेताना मुलीचे लग्न झालेले नसावे