Maharashtra LIVE Blog: गणरायाच्या आगमनाला एक दिवस शिल्लक असून लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. दुसरीकडे गणेशोत्सव काळात पाऊसही दमदार हजेरी लावण्याची चिन्हे दिसत आहेत. कालही मुंबईमध्ये अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. आजपासून पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Live Update : मराठा भवनसाठी कोल्हापुरात मराठा समाजाकडून निदर्शने
मराठा महासंघाने ज्या जागेवर दावा केला ती जागा दुसऱ्या एका संस्थेला दिल्यामुळे कोल्हापुरातील मराठा समाजाकडून निदर्शने करण्यात आली. मंगळवार पेठ येथील विश्वपंढरी नजीकची ही जागा आहे. मराठा भवन याच जागेवर झालं पाहिजे अशी मागणी या कार्यकर्त्यांची आहे.
Live Update :जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज ; पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ !
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, पुढील दोन दिवसात ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २६ व २७ ऑगस्ट रोजी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात पावसासह ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ १४ टक्के पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १०५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. याआधी हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात तीन वेळा ‘यलो अलर्ट’ आणि एकदा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. ३१ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे अंतरवाली सराटीत
मुंबईतील मोर्चा थांबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे अंतरवाली सराटीत
मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार
Live Update : पुण्यात फ्लेमिंगो पक्षांचे आगमन...
सकाळी श्रींच्या मंदिराच्या परिसरातून फ्लेमिंगोचे थवे नदीच्या दिशेने येताना दिसले आणि काही वेळ त्यांनी नदीकाठी मुक्त संचार केला. यानंतर, त्यांनी किनाऱ्यावरच विसावा घेतला. गुलाबी रंगाचे हे सुंदर पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने नदीकाठी जमा होत आहेत. त्यांच्या मुक्त संचारामुळे कुकडी नदीच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. गेल्या काही वर्षांपासून फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी नियमितपणे येत असल्यामुळे ओझर हे पक्षी निरीक्षकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. पर्यावरणप्रेमींनी या पक्षांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
Live Update : अतिवृष्टीनंतर सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचं संकट
वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर आता सोयाबीन पिकावर येल्लो मोझॅक रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहलय. मोझॅकमुळं सोयाबीनची पानं पिवळी पडत असून पीक सुकतंय त्यामुळं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Live Update : दापूरच्या अंथुर्णे गावात भरदिवसा घरफोडी, तब्बल 7 लाख 21 हजारांचा मुद्देमाल लंपास…
इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावात भर दिवसा घरफोडीची घटना घडली आहे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत घरातून ६ तोळे सोन्याचे दागिने व तब्बल ४ लाख २१ हजारांची रोकड असा एकूण ७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. फिर्यादी सुधाकर उर्फ बाळू सोनवणे यांच्या तक्रारीवरून वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वालचंदनगर पोलिस करीत आहेत...
Live Update :मुंबई ॲक्वामेट्रोतून पहिल्यांदाच गणपतीचं आगमन
मुंबई ॲक्वामेट्रोतून पहिल्यांदाच गणपतीचं आगमन
मुंबईतील खड्ड्याच्या साम्राज्याला कंटाळून गणेशभक्तांनी थेट मुंबई मेट्रोच्या एक्वा लाईन मधुन गणपती बाप्पा घरी आणले
मेट्रोची एक्वा लाईन सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच गणरायांचं आगमन मेट्रोने झाले आहे
पश्चिम द्रुतगती मार्गावरती अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे प्रभादेवीतुन थेट अंधेरी पर्यंत गणपती बाप्पांनी मेट्रोचा प्रवास केला
Live Update : गणेशोत्सवासाठी मुंबईत 17.500 पोलीस तैनात
२७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या १० दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईत १७,६०० हून अधिक पोलीस कर्मचारी मुंबईतील रस्त्यांवर तैनात असतील. या उत्सवासाठी घोड्यावर बसवलेले पोलीस पथक, ड्रोन, बॉम्ब शोधक आणि निकामी करणारे पथक (बीडीडीएस) आणि श्वान पथके देखील विस्तृत तैनातीचा भाग आहेत. नागरिकांना गैरसोय होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी खबरदारी घेतली जात आहे
Live Update : उजनी धरण काठोकाठ भरल्याने उजनीतून विसर्ग वाढवला
पुणे सोलापूर नगर धाराशिव जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेलं उजनी धरण काठोकाठ भरलं आहे.उजनी धरणातील पाणीसाठा 105 टक्क्याच्या वर गेल्याने काल रात्रीपासून उजनीतून भीमा पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय.सध्या उजनीत 119 टीएमसी हून अधिक पाणीसाठा असून उजनीतून भीमा पात्रात 16 दरवाज्यातून 45 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Live Update : बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक, तळकोकणात गणेश चतुर्थीची धुम
तळकोकणात गणेश चतुर्थीची धुम पाहायला मिळतेय. बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना कुडाळ बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. गणपतीच्या सजावटीसाठी रंगबेरंगी फुले व फळे बाजारात आणण्यात आली आहेत. स्थानिक शेतकरी पावसात उगवणारी फुले व फळे बाजारात विक्रीसाठी घेऊन आले आहेत. माटवीला सजवण्यासाठी या फुला फळांचा वापर केला जातो. चाकरमानी सुद्धा कोकणात दाखल झाले असून खरेदीसाठी बाजारात लोकांनी गर्दी केली आहे.
Live Update : लातुरमध्ये बैलांसमोर नृत्यांगना नाचवल्याने शेतकऱ्यावर गुन्हा
लातूर जिल्ह्यातल्या मुरुड अकोला येथे पोळा सणाच्या मिरवणुकीदरम्यान बैलांसमोर नृत्यांगनांचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी शेतकरी रत्नाप्पा बिडवे यांच्यावर गातेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन आणि विना परवाना वाद्य वाजवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. बैल पोळ्या दिवशी लातूर जिल्ह्यातील मुरुड अकोला येथील शेतकरी रत्नाप्पा बिडवे यांनी बैलाचं म्हणणं त्यांना नाचवण्यासाठी आणल्या होत्या मात्र हे कृत्य त्यांना आता चांगलंच महागात पडल्याचे पाहायला मिळतय
Live Update : गांधीनगरमधील रस्त्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष
पश्चिम महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या गांधीनगरमधील रस्त्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. सण उत्सव काळात या बाजारपेठेत मोठी गर्दी असते. कोल्हापूरसह इतर राज्यातून व्यापारी, ग्राहक याठिकाणी येत असतात. त्यामुळे या बाजारपेठेतील रहदारी आणि अपघातांची संख्या पाहता प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. अपघातांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण आहेत.. सार्वजनिक बांधकाम विभागातील उपभियंत्यांना निवेदन देऊन योग्य ती खबरदारी घ्या अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा दिला.. ठीकठिकाणी खड्डे असल्याने मुख्य रस्त्यांचा सर्वे करून योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी निवेदनातून केली.
Live Update : प्रमोद पाडसवान हत्याकांड प्रकरणी तीन आरोपींची वाढ
प्रमोद पाडसवान यांच्या हत्येत सोमवारी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आणि कुटुंबाच्या जबाबानंतर सहा आरोपीं व्यतिरिक्त याप्रकरणात तीन आरोपी वाढवण्यात आले. यात मंडळाचा अध्यक्ष अरुण गव्हाड, मंगेश वाघ व हल्लेखोर निमोनेची बहीण जयश्री यांना आरोपी करण्यात आले. यापैकी अरुण व मंगेशला ताब्यात घेण्यात आले. तर आपल्याला आरोपी करण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच जयश्री पसार झाली. तिघांवर हत्ये दरम्यान हल्लेखोरांना मारण्यापासून थांबवण्या ऐवजी मृत व जखमींना पकडून ठेवत हत्येसाठी अप्रत्यक्ष मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Live Update: नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा दमदार कमबॅक....
नंदुरबार जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यानंतर देखील जिल्ह्यात अवघ्या 34 टक्के पाऊस बरसला होता यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली होती मात्र मागील पाच दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत असून आज सकाळपासूनच जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने या पाच दिवसात नंदुरबार जिल्ह्यात 11 टक्के पाऊस झाला असून जिल्ह्यात सरासरीच्या 45 टक्के पाऊस बरसला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे तसेच धरण क्षेत्रात पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
Live Update: उजनी धरण काठोकाठ भरल्याने उजनीतून विसर्ग वाढवला
पुणे सोलापूर नगर धाराशिव जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेलं उजनी धरण काठोकाठ भरलं आहे.उजनी धरणातील पाणीसाठा 105 टक्क्याच्या वर गेल्याने काल रात्रीपासून उजनीतून भीमा पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय.सध्या उजनीत 119 टीएमसी हून अधिक पाणीसाठा असून उजनीतून भीमा पात्रात 16 दरवाज्यातून 45 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Live Update: जळगाव जिल्ह्यात केवायसी विना 1 लाख 61 हजार 798 पोस्टांची खाते बंद
जळगाव जिल्ह्यात केवायसी न केल्यामुळे 1 लाख 61 हजार 798 पोस्टाची खाते बंद अवस्थेत असून या खात्यांमध्ये नियमित व्यवहार होत नसल्याने हे खाते निष्क्रिय श्रेणीत टाकण्यात आले आहे. केवळ शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडून पोस्टाची खाते काढले जातात मात्र त्यानंतर या खात्यांवर अनियमित व्यवहार होत असल्याने परिणामी अशी खाते निष्क्रिय श्रेणीत टाकण्यात आले आहे.
Live Update: मेहरून तलाव परिसरात वॉटर फ्रंट उभारले जाणार
जळगाव शहरातील मेहरून तलाव परिसरात वॉटर फ्रंट उभारले जाणार असून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मेहरून तलाव परिसराचा कायापालट होणार आहे यासाठी प्रादेशिक पर्यटन विभागाच्या वतीने 15 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला असून वर्षभरात दोन टप्प्यांमध्ये तलाव परिसरातील रस्ते पथदिवे विद्युत रोषणाई, लॉन, कारंजे इत्यादी कामे पूर्ण होणार असून यामुळे लघुउद्योगांना देखील चालना मिळणार आहे.
Pune News live Update: पूर्णा नदी पात्रातील भरावामुळे संभाव्य पूरस्थितीचा धोका
इंदोर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेड जवळ असलेल्या पूर्णा नदी पात्रात भराव टाकून पुलाचे काम केले जात असून मात्र यामुळे संभाव्य पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराकडून नदीच्या पात्रात मुरूम टाकून भराव टाकण्यात आला असून या भरावामुळे मात्र नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होऊन कृत्रिम पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.