MSEDCL Hikes Tariffs: दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा करंट! प्रति युनीट किती बिल वाढणार?

Maharashtra Electricity Price Hike: या दरवाढीचा थेट परिणाम घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

MSEDCL Hikes Tariffs News: ऐन दिवाळी सणासुदीच्या तोंडावर वीज दरवाढीचा मोठा 'शॉक' बसला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या वीज बिलांमध्ये प्रति युनिट ३५ पैशांपासून ते ९५ पैशांपर्यंत 'इंधन समायोजन शुल्क' (Fuel Adjustment Charges - FAC) आकारण्यात आले आहे. या दरवाढीचा थेट परिणाम घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

महावितरण विभागाने (Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd) १ ऑक्टोबर रोजी एक परिपत्रक (Circular) जारी करून सप्टेंबर महिन्यात झालेल्या वीज वापरासाठी हे इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, महावितरणने १ जुलैपासून वीज दरात कपात केल्याचा दावा करत नवीन दर लागू केले होते. मात्र, लगेचच ऑगस्ट महिन्याच्या बिलात हे शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरच्या वापरासाठी ही दरवाढ लागू केल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.

BJP vs Shivsena: "मीरा-भाईंदर महापालिकेने शिवसेनेत प्रवेश केला!" भाजप आमदाराची फेसबुक पोस्ट चर्चेत

किती होणार वाढ? (प्रति युनिट):
महावितरणने जारी केलेल्या दरवाढीनुसार, विजेचा वापर जास्त असलेल्या ग्राहकांना सर्वाधिक फटका बसणार आहे.

सर्वात कमी वापर (१ ते १०० युनिट): प्रति युनिट ३५ पैसे

मध्यम वापर (१०१ ते ३०० युनिट): प्रति युनिट ६५ पैसे

जास्त वापर (३०१ ते ५०० युनिट): प्रति युनिट ८५ पैसे

सर्वाधिक वापर (५०१ युनिटपेक्षा जास्त): प्रति युनिट ९५ पैसे

महावितरणची भूमिका:
वीज दरवाढीचे कारण स्पष्ट करताना महावितरणने सांगितले की, राज्यातील वीज मागणीत मोठी वाढ झाल्यामुळे त्यांना खुल्या बाजारातून (Open Market) जास्त दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच अधिक उत्पादन खर्च (High Production Cost) असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला, ज्यामुळे हा अतिरिक्त भार इंधन समायोजन शुल्काच्या स्वरूपात ग्राहकांकडून वसूल केला जात आहे. मात्र, सणासुदीच्या काळात अशा प्रकारे वाढीव शुल्क लावल्यामुळे ग्राहक संघटनांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.