जाहिरात

BJP vs Shivsena: "मीरा-भाईंदर महापालिकेने शिवसेनेत प्रवेश केला!" भाजप आमदाराची फेसबुक पोस्ट चर्चेत

आमदार मेहता यांच्या या फेसबुक पोस्टमुळे महापालिका प्रशासनातील अधिकारी एका राजकीय कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

BJP vs Shivsena: "मीरा-भाईंदर महापालिकेने शिवसेनेत प्रवेश केला!" भाजप आमदाराची फेसबुक पोस्ट चर्चेत

मनोज सातवी, मीरा-भाईंदर

BJP vs Shivsena: भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आमदार मेहता यांनी फेसबुक पोस्ट करत मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांना लक्ष्य केले आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांनी हजेरी लावल्यामुळे आमदार मेहता यांनी थेट महापालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे.

आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, "मीरा-भाईंदर महानगरपालिकेने शिवसेनेत प्रवेश केला, अभिनंदन!" मीरा-भाईंदरमध्ये जुन्या इमारतींच्या पुनर्विकासावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे मेहता यांनी आयुक्तांसह महापालिकेला लक्ष्य केले.

(नक्की वाचा-  Akola News: 'अपघात झालाय, पैशांची मदत करा!', एकनाथ शिंदेंना थेट कॉल, पण सत्य समोर येताच...)

मार्गदर्शन शिबिरात अनेक अधिकारी उपस्थित

मिरारोड पूर्वच्या पद्मभूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे, सहकारी संस्था उपनिबंधक आणि महापालिकेचे इतर संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.

आमदार मेहता यांच्या या फेसबुक पोस्टमुळे महापालिका प्रशासनातील अधिकारी एका राजकीय कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील स्थानिक राजकारण अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com