Maharashtra Heavy Rain News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण मराठवाड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान केले आहे. पावसाच्या या रौद्ररुपाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 2 हजार 215 कोटींची मदत जाहीर केली आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात होती. याबाबत आता मोठा निर्णय घेण्यात आला असून 2 हजार 215 कोटींची नुकसान भरपाईसाठीची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने ही मोठी घोषणा केली आहे. 31. 64 लाख लोकांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली, त्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
राज्यात पावसाने झोडपून काढले आहे , अस असताना पालकमंत्री अजून जिल्ह्यामध्ये आढावा घ्यायला गेले नाही. या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असा इशारा आहे त्यामुळे लोकांना, जनावरांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, गरज पडल्यास अतिरिक्त NDRF च्या टीम तैनात करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. दरम्यान, सरकारने अद्याप ओला जाहीर दुष्काळ केला नसला तरी मोठी मदत दिली आहे.