
संकेत कुलकर्णी, पंढरपूर
Solapur News: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP SP) गटाचे करमाळा येथील आमदार नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात हजेरी लावली आहे. केवळ उपस्थितीच नाही, तर त्यांनी जाहीरपणे आगामी सर्व निवडणुका शिवसेनेसोबत लढणार असल्याचे घोषित केले आहे. यामुळे शरद पवार गटाला सोलापूरमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत करमाळा येथे हा शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेसोबत काम करणार असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी मोहोळचे आमदार राजू खरे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता नारायण पाटील यांच्या या भूमिकेमुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
विजयसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक
आमदार नारायण पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या भूमिकेमुळे सोलापूरच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.
आमदार पाटील म्हणाले की, “भविष्यकाळात एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रच काम करणार आहोत. कोणत्याही गटाचा किंवा पक्षाचा विचार न करता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार आहोत.” त्यांच्या या घोषणेने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world