IMD Rain Update: राज्यात 5 ऑक्टोबरपर्यंत पाऊस; पुणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यांत जोरदार हजेरी, वाचा संपूर्ण अंदाज

Maharashtra Rain Alert:  बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील मान्सूनची एक्झिट लांबली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Maharashtra Rain Alert : या कालावधीत ढगाळ हवामान आणि पावसाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे.
मुंबई:

Maharashtra Rain Alert:  बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे, महाराष्ट्र राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीत ढगाळ हवामान आणि पावसाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून राज्यात किमान 5 ऑक्टोबरपर्यंत तरी कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि शेतकऱ्यांना शेतीचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे पावसाचा अंदाज?

26 सप्टेंबर:

दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाडा भागांमध्ये दुपारनंतर हवामान ढगाळ होऊन पावसाची वाढ अपेक्षित आहे. यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात हलका पाऊस पडू शकतो.

( नक्की वाचा : Menstruation Cycle: मासिक पाळीचा 'हा' Viral Video पाहून डोळ्यात येईल पाणी, या कुटुंबानं जिंकली सर्वांची मनं )
 

27 सप्टेंबर: पावसाचे प्रमाण आणि क्षेत्र वाढणार

दक्षिण मराठवाड्यात या दिवशी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस, तर उर्वरित विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम, तर मराठवाडा लगतच्या सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. खानदेशात प्रामुख्याने हलका पाऊस पडेल.

28 सप्टेंबर: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोर अधिक

या दिवशी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. या दिवशी  अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये 
मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर  मुंबई महानगर (मुंबई शहर, ठाणे आणि पालघर जिल्हे) परिसरातही पाऊस अपेक्षित असून, काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.

Advertisement

पश्चिम विदर्भ, पश्चिम मराठवाडा आणि खानदेशात हलका ते मध्यम, तर उर्वरित विदर्भात हलका पाऊस अपेक्षित आहे.

नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरण साठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे, अशी सूचना केली आहे.  विशेषतः, काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
 

Advertisement
Topics mentioned in this article