Maharashtra Rain News: भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनच्या उत्तरार्धाबाबत एक महत्त्वपूर्ण आणि तितकीच चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. देशात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याचा विचार केला तर, ऑगस्टमध्ये महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही निवडक भागांमध्ये ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर खरोखरच असे घडले, तर या भागातील बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
ऑगस्टमधील पावसाचा अंदाज! शेतकऱ्यांची चिंता वाढली
यंदाच्या हंगामात जुलैच्या शेवटी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी १ जूनपासूनची सरासरी अद्याप गाठता आलेली नाही. विदर्भात १ जूनपासून सरासरीच्या ९५ टक्के तर मराठवाड्यात ९२ टक्क्यांपर्यंतच नोंद झाली आहे. याउलट कोकणात पावसाने सरासरी ओलांडत १०१ टक्के नोंद केली आहे, तर मध्य महाराष्ट्रात तर १ जूनपासून सरासरीच्या तब्बल १२५ टक्के पाऊस कोसळला आहे.
आकडेवारीनुसार, विदर्भात ३१ जुलैपर्यंत ४८४.७ मिमी ऐवजी ४६२.८ मिमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात ३०५.१ मिमी ऐवजी २८१.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याविपरीद मध्य महाराष्ट्रात ३८७.2 मिमी ऐवजी ४८३.४ मिमी आणि कोकणात १७६५ मिमी ऐवजी १७६७.५ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. आता सर्व मदार ऑगस्ट महिन्यातील पावसावर आहे.
आज पावसाचा अंदाज काय?
दरम्यान, आज 2 ऑगस्ट 2026 रोजी रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच 3 ऑगस्ट 2026 रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Ambarnath News: अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळला, थेट आमदार बालाजी किणीकरांवर निशाणा