Maharashtra monsoon updates : गेल्या आठवडा भरापासून राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे घाट परिसरात पुढील 24 तासांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, Sachet प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मागील सात दिवसांत 253.74 कोटी नागरिकांना हवामानाचे अलर्ट संदेश पाठवण्यात आले आहेत. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्याच्या किनारपट्टी भागातही समुद्राने रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) ठाणे, पालघर, रायगड, आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उंच लाटांचा इशारा दिला आहे. या काळात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
( नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय? )
राज्यातील अनेक नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या खुणेच्या वर गेली आहे. रत्नागिरीतील जगबुडी, रायगडमधील अंबा आणि ठाण्यातील काळू नदी इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचीही स्थिती गंभीर आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि आंबेगाव तालुक्यात दरड कोसळण्याची शक्यता असल्याने काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच, घोडनदीत अडकलेल्या पाच व्यक्तींना 'आपदा मित्र' दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती कायम
पश्चिम महाराष्ट्रातही पूरस्थिती कायम आहे. अलमट्टी धरणाच्या विसर्गावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. कृष्णा नदीची पातळी वाढल्याने सांगलीतील आयर्विन पूल येथे धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर, उजणी धरण पूर्ण भरल्याने भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून, वाहतुकीसाठी काही रस्ते बंद करण्यात आले आहेत.