देशाचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे काल रात्री निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशभरात हळहळ व्यक्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांना आदरांजली वाहिली. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असून देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
Live Update : पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, लोकलनं 3 जणांना उडवलं
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटना स्थळी, RFP आणि रेल्वे पोलीस दाखल झाले आहेत. पालघर येथील बंद असलेले जुने रेल्वे फाटक येथे रूळ ओलांडून जाणाऱ्यांचा अपघात झाला. विरारहून डहाणूकडे जाणाऱ्या लोकलने तिघांना उडवलं. या अपघातामध्ये सोनू राम (वय 35), मनोज कुमार (वय 18 ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अनुज पंडित (वय 20) हा गंभीर जखमी झाला आहे.
महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई 24 तासात 19 बांगलादेशी नागरिकांना अटक
महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. गेल्या 24 तासात 19 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यात ठाणे आणि नवी मुंबई येथून 13 जणांना ताब्यात घेतले आहे. यात 7 पुरूष आणि 6 महिलांचा समावेश आहे. जालन्यातही अशीच कारवाई करण्यात आली आहे. त्यात तीन बांगलादेशीना ताब्यात घेण्यात आलं आहे. शिवाय सोलापुरातही अशीच कारवाई झाली आहेत. त्यात तीन बांगलादेशी तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
Live Updates: Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडच्या पत्नीची CID कडून चौकशी
बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी तपासाला वेग आला आहे. वाल्मिक कराड सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी पत्नीची सीआयडीकडून चौकशी करण्यात येत आहे. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये ही चौकशी सुरु आहे. दीड तासांपासून ही चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना लातूर मधून चौकशीसाठी बीड शहर पोलीस स्टेशनला बोलवण्यात आल्याची माहिती आहे. वाल्मिक कराड यांचे दोन्ही बॉडीगार्ड यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे
घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडले , एका महिलेचा मृत्यू
घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने 5 ते 6 पादचाऱ्यांना चिरडले आहे. त्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी बेस्ट बसने अशाच पद्धतीने कुर्ल्यात लोकांना चिरडले होते.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी सरकारने मदत करावी - खरगे
डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी सरकारने मदत करावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे.
बस पुलावरून कोसळली, 8 जणांचा मृत्यू
पंजाबच्या बठिंडामध्ये मुसळधार पावसात पुलावरून एक बस खाली कोसळली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये 20 प्रवाशी प्रवास करत होते.
मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील अखिलेश शुक्लाच्या अडचणी वाढल्या
मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील अखिलेश शुक्ला आणि पत्नी गीता शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कल्याणमध्ये ही मारहाण शुक्ला पती पत्नीने केली होती. आरोपी अखिलेश शुक्लासह सर्व आरोपींचा पोलीस कोठडीत वाढ दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या पोलिस कोठडीत वाढ
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्याची पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्याला कोर्टात सादर करण्यात आलं. त्यावेळी त्याच्या कोठडीत 6 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने आणखी 10 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावली आहे.
हवेत गोळीबार करणारे कैलास फड यांना जामीन मंजूर
अंजली दमानिया यांनी कैलास फड यांचा हवेत गोळीबार करत असताना व्हिडीओ ट्विट केला होता. व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर कैलास फड यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. कैलास फड यांना आता हवेत गोळीबार केल्याप्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Latur News: माझ्या वडीलाला न्याय मिळालाच पाहिजे; आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, वैभवी देशमुख
लातूरच्या रेणापूर इथ संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता.सरपंच संतोष देशमुख याची मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख दोघेही मोर्चात सहभागी झाले होते.. आपण मोर्चामध्ये सहभागी झालात..यापुढे ही आपली साथ आम्हाला कायम राहू द्या..आणि आमच्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे....आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळालीच पाहिजेत...यापुढे होणारे आंदोलन मोर्चे शांततेच्या मार्गाने व्हावा आणि माझे वडील मला पोरखे करून गेले तसे तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका..माझ्या वडीलाला न्याय मिळाला पाहिजे.अशी भावना यावेळी वैभवी देशमुख यांनी व्यक्त केली आहे..
Supriya Sule: मनमोहन सिंग हे ग्लोबल लिडर: सुप्रिया सुळेंनी सांगितल्या आठवणी
डॉ. मनमोहन सिंग हे सुसंस्कृत सुशिक्षित पंतप्रधान होऊन गेले. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली माझे भाग्य. सशक्त लोकशाहीत कसं नातं असावं हे युपीए काळात पाहायला मिळाले. मनमोहन सिंग ग्लोबल लीडर आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष यांनी मनमोहन सिंग यांना गुरू मानले. मनमोहन सिंग आणि शरद पवार साहेब १० दिवसांतून ५ दिवस भेटत असे. सहका-याला कसा मान सन्मान द्यायचा हे मनमोहन सिंग यांच्याकडून शिकावं. ते पुस्तक खूप वाचायचे आणि आवर्जून वाचायला सांगायचे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी आठवणींना उजाळा दिला.
Dr. Manmohan Singh Passes Away: मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधींनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. आज मनमोहन सिंग यांचे पार्थिव त्यांच्या दिल्लीमधील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवले असून देशभरातील नेते त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच आदरांजली अर्पण केली.
Manmohan Singh Death: भारतमातेच्या कर्तृत्तवान चारित्र्यसंपन्न सुपुत्राला देश मुकला: शरद पवार हळहळले
'देशाला अस्वस्थ करणारी ही बातमी आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक पद्धतीने देशाची सेवा करण्यासाठी त्यांनी योगदान दिले. मनमोहन सिंग यांचा पिंड राजकारणी नव्हता. ते अर्थशास्त्रज्ञ होते, विचारवंत होते, देशाचं भवितव्य कास सुधारलं पाहिजे याचा विचार ते कायम करायचे.
चंद्रशेखर राव देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून मनमोहन सिंग यांचा वाटा होता. त्यानंतर नरसिंगराव यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थखात्याचे मंत्री होते आणि माझ्याकडे संरक्षणमंत्रिपद होते. ते मितभाषी होते मात्र आपल्या भूमिकेशी कट्टर होते. त्यांच्याकडे देशाचे पंतप्रधानपद आल्यानंतर त्यांनी देशाला आर्थिक दिशा देण्याचे काम केले. तो काळ इतका संकटाचा होता, त्यामधून सावरुन त्यांनी त्याला अधिक भरीव निर्णय घेऊन त्यांनी त्या देशातू संकटातून देशाला बाहेर काढले.
एका कर्तृत्तवान चारित्र्यसंपन्न, भारतमातेच्या सुपुत्राला देश मुकलेला आहे. मी त्यांचा सहकारी म्हणून हा दुःखाचा धक्का सहन करण्याची शक्ती देओ, अशी मी प्रार्थना करतो, असं म्हणत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
PM Narendra Modi: जनतेच्या, देशाच्या विकासाच्या प्रती त्यांची निष्ठा होती ती नेहमी स्मरणात राहील: PM मोदींकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वेगवेगळ्या पदांवर भारत सरकारमध्ये सेवा केली. आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी रिझर्व बँकेचे गव्हर्गरपद सांभाळले. जनतेच्या प्रती, देशाच्या विकासाच्या प्रती त्यांची जी निष्ठा होती ती नेहमी स्मरणात राहील. मला आठवतं, या वर्षाच्या सुरुवातीला त्यांची राज्यसभा संपली तेव्हा मी म्हणालेलं खासदार म्हणून त्यांची निष्ठा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
त्यांनी आपली सामान्य मुल्य कधी सोडली नाहीत. राजकारणापलिकडे त्यांनी सर्वांशी संबंध जपले. मी मुख्यमंत्री असताना मनमोहन सिंग यांच्याशी अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा व्हायची. मला त्यांच्या या भेटी, चर्चा नेहमी लक्षात राहतील. त्यांच्या वाढदिवसालाही मी सोबत होतो. मी डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
Congress News: काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचे संकेत, 13 महिन्याचा एक्शन प्लॅन तयार
काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांचे संकेत; पक्ष पुनर्बांधणीचे कार्य तत्काळ सुरू करणार
काल आणि आज दोन दिवसीय काँग्रेस पक्ष कार्यकारणीची बैठक बेळगाव येथे आयोजित करण्यात आली होती
या बैठकीत पुढील १३ महिन्यांचा काँग्रेस पक्षाचा एक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे
या १३ महिन्याच्या एक्शन प्लॅन मधे विविध पदयात्रा असतील आणि त्याचसोबत महागाई आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर आवाज उठवणे असतील आणि प्रामुख्याने संविधानावर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात या राजकीय अभियानात भर दिला जाणार आहे
या शिवाय काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बदल देखील करण्यात येणार आहेत
येत्या नवीन वर्षात देशभरात जय बापू,जय भीम,जय संविधान हे अभियान काँग्रेस कडून राबविण्यात येणार आहे
पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात महात्मा गांधी यांच्या पोरबंदर या जन्मस्थळी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन घेण्यात येणार
Satish Wagh Murder Update: सतिश वाघ हत्या प्रकरण: खून केल्यानंतर आरोपींनी हत्यार टाकले भीमा नदीत
अपहरण करून खून केल्यानंतर आरोपींनी हत्यार टाकले भीमा नदीत
आरोपी नवनाथ गुरसाळे व त्याचा साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी मिळून वाघ यांच्या खुनासाठी वापरलेले हत्यार टाकले नदीत
पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून पेरणे फाटा येथे भीमा नदी पात्रात टाकले हत्यार
दोन्ही आरोपींच्या माध्यमातून हत्यारांची शोध घेवुन ते जप्त करावयाचे असल्याची पोलिसांनी न्यायालयाला दिली माहिती
खुनाच्या सुपारीसाठी ठरलेल्या रकमेपैकी मोहिनी वाघ ने किती पैसे अक्षय जावळकर याला दिले. हे पैसे कशा प्रकारे देण्यात आले याचा तपास पोलिसांकडून सुरू
पुण्यातील हडपसरमधील व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खूनप्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक करण्यात आली आहे
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी दाखल
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दुखःद निधन झाले. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. मनमोहन सिंग यांचे पार्थिव त्यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अंत्यदर्शनासाठी दाखल झाले आहेत.
Raj Thackeray Tribute To Manmohan Singh: न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते... , राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांच्यासाठी खास पोस्ट
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. १९९१ ला जेंव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं.
जुलै १९९१ साली संसदेत भाषण करताना मनमोहनसिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, "no power on earth can stop an idea whose time has come". थोडक्यात भारताचा काळ सुरु होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिग.
पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले. आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतुंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य म्हणाले होते, "I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament.... "
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी 'ये दिल मांगे मोअर..' ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच.
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन...
Mumbai CNG Price: मुंबईकरांच्या खिशाला कात्री; सीनजी दरात पुन्हा वाढ
नव्या वर्षाच्या स्वागताला काही दिवस उरले असतानाच मुंबईमध्ये पुन्हा एकदा सीएनजी दरात वाढ झाली आहे. एका महिन्यात सीएनजीची दुसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. एक रुपयाने किंमत वाढल्याने मुंबईमध्ये सीएनजीची किंमत 78 रुपये प्रति किलो झाली आहे.
Neera River: निरा नदी प्रदुषणाच्या विळख्यात, ग्रामस्थांचा संताप
नीरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचा आरोप बारामती तालुक्यातील खांडज मधील ग्रामस्थांकडून करण्यात आलाय.गेल्या वर्षांपासून निरा नदीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून यावरती कुठल्याही राजकीय पक्षांनी आश्वासन देऊन देखील कोणतेही काम केलं नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.तर निरा नदीच्या प्रदूषणाबाबत लक्ष वेधण्यासाठी आता एक मोठ जण आंदोलन उभारण्याची गरज असल्याचं मिथुन आटोळे यांनी म्हटलयं.……
Dharashiv News: आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी आधुनिक लहुजी शक्ती सेनेची मागणी
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की आरक्षणाचा उपवर्गीकरण हे राज्य शासनाच्या मार्फत करता येत माञ चार महीने होवुन ही राज्यसरकार निकालाची अमलबजावणी करत नाही किंवा पाठपुरावा करत नाही त्यामुळे आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करुन विविध मागण्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Vijay Wadettiwar: सुसंस्कृत राजकारणाचे पर्व संपले, दिग्गजांकडून डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकून मन हेलावले आहे. देशातील सुसंस्कृत राजकारणाचे एक पर्व त्यांच्या निधनाने संपले!
विरोधकांकडून टोकाची टीका सहन करूनही संयमाने राजकारण करता येते याचा धडा त्यांनी राजकीय नेत्यांना आपल्या वागणुकीने दिला!
देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये त्यांनी दिलेले योगदान आणि 1991 च्या उदारीकरणाचा ऐतिहासिक निर्णय भारताच्या विकासाचा पाया ठरला. डॉ.मनमोहन सिंगजी यांनी यांच्या धाडसी आणि विकासात्मक धोरणांमुळे आज भारत आधुनिकतेची कास धरून प्रगत झाला आहे.
शांत, विद्वत्तापूर्ण आणि दूरदृष्टीने भरलेले त्यांचे नेतृत्व देशासाठी प्रेरणादायी होते.परराष्ट्र धोरणापासून ते आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यापर्यंत त्यांच्या कार्यकाळातील योगदान अमूल्य आहे
आज देशाने एक महान नेता, अर्थतज्ज्ञ आणि सच्चा देशभक्त गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Manmohan Singh Passes Away: महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड
देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंह साहेबांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय राजकीय कारकिर्दीत भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घातला. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चालना दिली. २००४ साली देशाचे पंतप्रधन म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सोनिया गांधी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी देशाला जागतिक पटलावर एक आर्थिक सत्ता म्हणून भारताला मान्यता मिळवून दिली. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा, मनरेगा असे कायदे करून त्यांनी सर्वसामान्यांच्या अधिका-यांना कायद्याचे रूप देत संविधानाने दिलेले अधिकार शेवटच्या रांगेतील लोकांना मिळतील याची काळजी घेतली. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली. त्यांचा दहा वर्षाचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासातील प्रगतीचा सुवर्णकाळ म्हणून लक्षात राहील. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे.
डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.