मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिशा सालियन हिची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिशा सालियनवर सामूहिक अत्याचार करुन हत्या करण्यात आल्याचा आरोपा तिच्या वडिलांनी केला होता. याप्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
या प्रतिज्ञापत्रामध्ये दिशा सालियन हिची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केला आहे. तसेच दिशा हिची हत्या झाल्याच्या आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांचा हत्येशी संबंध असल्याच्या याचिकाकर्त्यांच्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे नाहीत, असेही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले.
Disha Salian: सालियान प्रकरणाला नवी 'दिशा', आता आदित्य ठाकरें बरोबर उद्धव ठाकरे ही अडकणार?
दरम्यान, दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप नारायण राणेंसह नितेश राणेंनी केला होता. याप्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करावी अशीही मागणी करण्यात येत होती. मात्र आता पोलिसांनी केलेल्या प्रतिज्ञापत्राने या सर्व आरोपांची हवाच काढली असून याप्रकरणात त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.