मेहबूब जमादार, रायगड: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन सध्या वाद सुरु आहे. रायगडचे पालकमंत्रिपद मिळावे यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही असून अदिती तटकरेंकडे हे पद गेल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच रायगडची जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवार यांनी बोलावली होती. मात्र या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे एकही आमदार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली होती. मात्र या बैठकीला शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यासह एकही आमदार उपस्थित नव्हते, त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पालकमंत्रिपदावरुन वाद सुरु असल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी बहिष्कार टाकल्याचे बोलले जात आहे, याबाबत आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नक्की वाचा - Pratap Sarnaik: '...तर मी टोलनाका फोडणार', परिवहन मंत्र्यांचा रौद्रावतार; ठेकेदाराला दिला सज्जड दम!
काय म्हणाले महेंद्र थोरवे?
"अजित पवार यांच्या दालनामध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत रायगडची जिल्हा नियोजनची बैठक ऑनलाईन घेण्यात आली. आमच्या मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला बोलवायला पाहिजे होते. जाणीवपूर्वक ही बैठक उपमुख्यमंत्री व मंत्री अशी घेण्यात आली. जिल्ह्यातील राजकारण पाहता ही बैठक घेण्यात आली,"
"त्यामुळे सर्व आमदार उपस्थित असणे गरजेचे होते. कलेक्टर उपस्थित होते, मग आमच्या आमदारांना का बोलावण्यात आलेलं नाही? आम्हीही तिथले लोकप्रतिनिधी आहोत, मग आम्हाला जाणूनबुझून बोलावलं नाही, असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला आहे. याबाबत आम्ही शिंदे साहेबांशी चर्चा करू, असे आमदार महेंद्र थोरवे म्हणालेत.