छत्रपती संभाजीनगर: राज्याच्या राजकारणात महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी निवडणुकींच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटामध्ये मात्र गळतीचे सत्र सुरुच आहे. निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरेंना छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक धक्का बसला असून माजी महापौर तथा उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपेंनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे त्र्यंबक तुपे हे सहावे महापौर ठरले आहेत. गेल्या ३८ वर्षांपासून शिवसेनेत असलेल्या तुपे यांच्या राजीनाम्याने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
जिल्हाप्रमुख पदाचे आश्वासन पूर्ण केलं नसल्याने पक्ष सोडल्याचा दावा त्र्यांबक तुपे यांनी केला आहे. ते शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बड्या नेत्याने साथ सोडल्याने संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेला राज्य निवडणूक आयोगाने काल मंजुरी दिली आहे. हा प्रभागरचनेचा आराखडा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशदेखील देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरात ११५ वॉर्ड असून त्यांचे २९ प्रभाग तयार करण्यात आले आहेत.
( नक्की वाचा : B.Sudarshan Reddy: सुदर्शन रेड्डी यांना विरोधकांनी उपराष्ट्रपतीचा उमेदवार का बनवले? वाचा संपूर्ण गेम प्लॅन )
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार शहरात चार वॉडांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. यासाठी ३८ ते ४० हजार लोकसंख्येची अट निश्चित करण्यात आली आहे.नगरविकास विभागाच्या आदेशानुसार मनपाने प्रभागरचना केली. शहरात ११५ वॉर्ड आहेत. त्यामुळे चार वॉडाँचे २८ प्रभाग आणि तीन वॉर्डाचा एक प्रभाग याप्रमाणे २९ प्रभागांची रचना करण्यात आली आहे.