सांगली: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले सासरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत. यावरुनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर चौफेर टीका होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र अजित पवारांची पाठराखण केली आहे.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत जयंत पाटील?
"वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येची घटना धक्कादायक आहेअनेकजण राजकारण्यांशी संबंधित असतात. घरातील घटनेवर नेत्यांचे नियंत्रण नसते. अनेकांचे अनेकांसोबत फोटो असतात. राजकारणी किंवा पदाधिकारी असं करा म्हणून सांगत नसतो किंवा प्रोत्साहन नसते. गुन्हेगारांना राजकारणी किंवा पदावर बसलेल्या व्यक्तींनी मदत करून इतकी माफक अपेक्षा आहे. त्यांच्या घरात जे काही घडलं त्याला अजित पवार जबाबदार असू शकतात असे मला वाटत नाही," असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
तत्पुर्वी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावरुन प्रतिक्रिया दिली होती. मला फक्त लग्नाला बोलावले होते मी त्या लग्नाला गेलो होतो. माझी काय चूक असेल तर मला फाशी द्या, असे म्हणत अजित पवार यांनी अशी माणसे माझे पक्षात नकोत. राजेंद्र हगवणे यांची त्यांची हकालपट्टी केली असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून गेल्या आठ दिवसांपासून फरार असलेल्या सासरे आणि दिराला अटक करण्यात आली आहे. आज पहाटे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या बापलेकाला अटक करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजता त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.