मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेला तणाव अखेर शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर संपुष्टात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संघर्ष संपवण्यासाठी मध्यस्थी केली. तसेच अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी जाहीर केले. एकीकडे भारत-पाक तणाव निवळला असतानाच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भारत- पाकिस्तान संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी कशासाठी? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले संजय राऊत?
'ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आहे असं सांगण्यात येत आहे.. असं म्हणणे हे चुकीचे आहे. व्हाईट हाऊसचे निवेदन, ट्रम्प यांचे ट्वीटर अकाऊंट पाहाल तर त्यांच्या सुचनेवरुनच भारताने युद्धबंदी स्विकारली आहे. ट्रम्प यांचा संबंध काय? आमची माणसं मेलीत आमच्या 26 महिलांचा जीव गेला आहे, मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प कोणत्या अधिकारावर मध्यस्थी करतात?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
"भारत सार्वभौम, महान राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो. कोणत्या अटींवर? काय मिळालं आहे भारताला? पूरा बदला लेंगे, पाकिस्तान के तुकडे करेंगे ही भाषा होती. कुठे गेले तिकडे? भारताची बेअब्रु झाली आहे जगामध्ये. पाकिस्तान मूर्ख देश आहे मात्र भारताच्या पंतप्रधानांना हे शोभत नाही. तुम्ही कोणत्या अटी- शर्तींवर युद्धबंदी केली यासंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी आणि त्यात पंतप्रधान मोदी असावेत त्यांनी पळ काढू नये," अशी मागणीही राऊत यांनी केली.
नक्की वाचा - भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story
"भारतीय सैन्याचे मनोबल उंचावलेले असताना देशाच्या राजकीय नेतृत्वाने कच खाल्ली. कोणासाठी पंतप्रधान ट्रम्प यांच्यासाठी. हेच मोदी 26-11 च्या हल्ल्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ओबामांशी चर्चा केल्यानंतर खिल्ली उडवत होते. ओबामांजवळ जाऊन रडत आहेत असं म्हणत होते मग आता मोदी ट्रम्प यांच्याजवळ जाऊन रडत आहेत का? नुकसान पाकिस्तानचे झाले नाही, भारताचे झाले आहे. ट्रम्प यांची मध्यस्थी मान्य केली जाते तर गाझा पट्टीवेळी ते कुठे होते. आताही ते भारतासोबत नाहीत. ठामपणे भारताच्या पाठीशी उभे राहणारा एकही मित्रदेश नाही," असेही राऊत यांनी बोलून दाखवले.