Maharashtra Railway Projects Sanctioned: भारतीय रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 24,634 कोटी रुपयांच्या चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये, महाराष्ट्रातील दोन मोठ्या मार्गांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज (7 ऑक्टोबर 2025) रोजी झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 8 आणि 9 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या मुंबई दौऱ्याच्या अगदी तोंडावर राज्याला हे 'गिफ्ट' मिळाल्याने कोकण, विदर्भ आणि खानदेशातील रेल्वे कनेक्टिव्हिटीला नवा आयाम मिळणार आहे.
या सर्व प्रकल्पांची एकूण किंमत 24,634 कोटी रुपये असून, 894 किलोमीटर लांबीच्या नव्या लाईन्स 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे 85 लाखांहून अधिक लोकांना थेट फायदा होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे दोन प्रकल्प (398 किमी)
महाराष्ट्रातील रेल्वे क्षमता वाढवण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण मार्गांना मंजुरी मिळाली आहे.
वर्धा-भुसावळ तिसरी आणि चौथी लाईन (314 किमी):
महत्त्व: विदर्भ आणि खानदेशाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. भुसावळ हे मोठे रेल्वे जंक्शन असल्याने, या मार्गामुळे मुंबई-कोलकाता (हावडा) मुख्य मार्गावरील वाहतुकीची गर्दी कमी होण्यास मदत होईल. हा मार्ग पूर्ण झाल्यास मालवाहतूक आणि प्रवासी गाड्यांची गती वाढेल, ज्यामुळे कोकणातून विदर्भ किंवा मध्य भारताकडे होणारी वाहतूक अधिक वेगवान होईल.
( नक्की वाचा : Mumbai Metro 3 Aqua Line: मुंबई मेट्रो 3 चा अंतिम टप्पा उद्घाटनासाठी सज्ज; वाचा संपूर्ण मार्ग आणि तिकीट दर )
गोंदिया-डोंगरगड चौथी लाईन (84 किमी):
महत्त्व: हा मार्ग महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याला छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याशी जोडतो. हा अत्यंत महत्त्वाचा कोळसा वाहतूक मार्ग असल्याने, चौथी लाईन झाल्यावर औद्योगिक मालवाहतुकीत प्रचंड वाढ होईल. गोंदिया-डोंगरगड मार्गाचा फायदा मध्य प्रदेश, छत्तीसगडसह विदर्भातील अनेक भागांना होणार आहे.
85 लाखांहून जास्त लोकांना प्रत्यक्ष लाभ
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या चारही प्रकल्पांमुळे सुमारे 3,633 गावांमधील 85 लाखांहून अधिक लोकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराचे नवीन मार्ग खुले होतील.
या नवीन लाईन्समुळे रेल्वे मार्गावरील ट्रेनची गर्दी कमी होईल. गाड्यांची गती वाढेल आणि वेळेवर धावण्याची क्षमता सुधारेल, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. त्याचबरोबर लॉजिस्टिक कार्यक्षमतेत सुधारणा झाल्यामुळे दरवर्षी 780 लाख टन (78 Million Tonnes) अतिरिक्त मालवाहतूक करणे शक्य होणार आहे.
( नक्की वाचा : Exclusive: रेल्वे प्रवाशांसाठी बंपर ऑफर; तिकीट रद्द न करता बदला तारीख, वाचा काय आहे प्रस्ताव? )
पर्यावरणाचे मोठे संरक्षण
हा प्रकल्प ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणाला अनुकूल असा आहे. या वाहतूक सुधारणांमुळे वातावरणातील 139 कोटी किलोग्राम कार्बन उत्सर्जन घटेल. पर्यावरणाचा हा फायदा सुमारे 6 कोटी (60 Million) झाडे लावल्याच्या बरोबरीचा आहे.
पंतप्रधान 'पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन' च्या माध्यमातून मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर देत आहेत आणि हा निर्णय त्याच दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे.