राकेश गुडेकर, रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे, जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथड्या भरून वाहताहेत.. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी (७ मीटर) ओलांडली असून, सध्या तिची पाणी पातळी ७.२० मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे खेड शहरातील मच्छी मार्केट परिसरात पाणी शिरलं आहे. जगबुडी नदीकाठच्या रहिवाशांना आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खेड-दापोली रस्ता बंद, वाहतूक पर्यायी मार्गाने
मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीलाही बसला आहे. नारिंगी नदीला आलेल्या पुरामुळे खेड-दापोली रस्त्यावर पाणी साचलं असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेत गडनदीच्या पुराचं पाणी दुसऱ्यांदा शिरलं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. दरवर्षी अशा परिस्थितीचा सामना करावा लागत असल्यामुळे प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे.
Maharashtra Rain Update : मुंबई, पुण्यासह राज्यभरात पुढील 4 दिवस मुसळधार; 'या' जिल्ह्याला रेड अलर्ट
चिपळुणात रात्रभर पाऊस.. पाणीपातळी नियंत्रणात
चिपळूण शहर व परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंता निर्माण झाली होती. मात्र, सध्या पाणीपातळी नियंत्रणात असून प्रशासनाने नागरिकांना काळजी न करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान शहरातील काही ठिकाणी पावसाचं पाणी रस्त्यावर साचलं आहे. दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावं असं आवाहन प्रशासनाने केलं आ. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८३.३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक १७८.७१ मिमी पावसाची नोंद झाली, तर चिपळूण आणि दापोलीमध्ये १२५ मिमी, तर मंडणगडमध्ये ११६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. गेल्या २४ तासांपासून जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. जिल्ह्याची सरासरी पावसाची नोंद २२.५ मिमी इतकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता, कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल मालवणमध्ये ३४ मिमी, तर दोडामार्गमध्ये २९ मिमी पावसाची नोंद झाली. वैभववाडी तालुक्यात २६ मिमी पाऊस झाला आहे.
नक्की वाचा - LIVE Blog: मुंबईत पावसाची संततधार सुरुच! सखल भागात साचलं पाणी
देवगड, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी तालुक्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. या ठिकाणी अनुक्रमे ६, ७, १५ आणि १९ मिमी पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील काही तास जिल्ह्यात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.