Rain Update : जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत मुंबई आणि आसपासच्या परिसरात फार कमी पाऊस झाला होता. जून महिना कोरडा गेल्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. रविवारपासून कोकण किनारपट्टी भागात पावसाला सुरूवात झाली असून पाऊस आता चांगला जोर धरेल अशी चिन्हं आहेत. 3 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून 1 ते 3 जुलै दरम्यान मुंबई, ठाणे परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर आज पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पालघर जिल्ह्याला आज २९ जून रोजी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना २९ जून ते ३ जुलैपर्यंत हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
लातूरकरांना दिलासा...
लातूर जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रेणापूर तालुक्यात सर्वाधिक २९.७ मिलीमीटर, तर देवणी तालुक्यात सर्वात कमी १.२ मिलीमीटर पाऊस झाला. लातूरमध्ये २१.७, चाकूरमध्ये २१.०, उदगीरमध्ये १६.२, जळकोटमध्ये १५.७, अहमदपूरमध्ये १४.४, शिरूर अनंतपाळमध्ये १३.३, औसामध्ये ६.० आणि निलंग्यात १.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अनेक भागांत अद्याप पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
पंढरपुरातही पहाटेपासून दमदार पावसाने लावली हजेरी
पंढरपूर तालुक्यातील चळे आंबे ओझेवाडी या परिसरात पहाटेपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नदीकाठच्या परिसरातील अनेक ओढ्या नदी नाले वाहू लागले असून अनेक शेतांमधून देखील आता पाणी उभारायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात शेत शिवार सह सर्वत्र पाणी वाहू लागल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळालेला दिसून येतो.