Captain Ashok Kharat Arrest : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर थेट आणि गंभीर निशाणा साधला आहे. चाकणकर या क्रमांक एकच्या खोटारड्या असून खरातच्या काळ्या कर्तृत्वाची त्यांना पूर्ण कल्पना होती, असा खळबळजनक दावा अंधारे यांनी केला आहे.
अंधारे यांचा चाकणकरांवर 'माफीनामा' अस्त्र
सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रूपाली चाकणकर यांच्या स्पष्टीकरणाचा चांगलाच समाचार घेतला आहे. कॅप्टन खरात याची दुष्कृत्ये जेव्हा 'खबरदार पुढारी' या स्थानिक वृत्तपत्राने उघड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा आणि प्रभावाचा वापर करून संबंधित पत्रकारावर कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती.
इतकेच नाही तर त्याच्याकडून लेखी माफीनामा घेतल्याचा आरोपही अंधारे यांनी केला आहे. ज्या चाकणकर आता आपल्याला काहीच माहित नाही असे सांगत आहेत, त्यांनी या माफीनाम्याबद्दल बोलावे, असे आव्हान अंधारे यांनी दिले आहे.
पीडितांना न्याय की चारित्र्यहनन?
सुषमा अंधारे यांनी या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही ओढले आहे. पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी सातत्याने महिलांचेच चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रूपाली चाकणकर यांची पक्षाला अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
वैष्णवी हगवणे, तनिषा दिसे आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासारख्या महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम चाकणकर यांनी केल्याचा गंभीर आरोप अंधारे यांनी केला असून तटकरेंनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
रुपाली चाकणकर यांनी काय दिले होते स्पष्टीकरण?
या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे रूपाली चाकणकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे असून तिथे अनेक सामाजिक कार्यक्रम होतात. एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपण त्या ट्रस्टच्या कामाशी जोडले गेलो होतो, मात्र कॅप्टन खरात याच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे किंवा त्याच्यावर काय आरोप आहेत, याची पुसटशी कल्पना आपल्याला नव्हती, असे चाकणकर यांनी म्हटले होते. पोलिसांच्या तपासावर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
महाराष्ट्राची 'एपस्टीन फाईल' आणि अघोरी प्रथा
सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण प्रकरणाला 'महाराष्ट्राची एपस्टीन फाईल' असे संबोधले आहे. खरात याच्या सांगण्यावरून अनेक बड्या राजकीय नेत्यांनी स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे किंवा विचित्र पूजा करणे असे अघोरी प्रकार केल्याची चर्चा लोकात सुरू असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. खरात प्रकरणाची माहिती चाकणकर यांना एक वर्षापूर्वीच होती, मात्र त्यांनी मुळाशी जाण्याऐवजी पुरावे दडपण्यावर आणि दबाव आणण्यावर भर दिला, असे अंधारे यांचे म्हणणे आहे.