संकेत कुलकर्णी, पंढरपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेचे निकाल आज जाहीर झाले. या निकालामध्ये कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. एकीकडे 10 वीच्या निकालात कुणाला 98 टक्के, कुणाला 80 टक्के अशी मार्क मिळाली असतानाच पंढरपूर तालुक्यात एका पठ्ठ्याने सर्व विषयात 35 गुण मिळवण्याचा अनोखा पराक्रम केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आपल्या शेतातील गाय आणि म्हशींच्या दुधाच्या धारा काढत पंढरपूर तालुक्यातील विशाल सलगर या दहावीतील विद्यार्थ्याने सर्व विषयांमध्ये 35 गुण मिळवत दहावी बोर्ड परीक्षेत 35 टक्के मार्क मिळवले आहेत. विशाल हा शेतातील सर्व कामे, तसेच गाई व म्हशी यांच्या दुधाच्या धारा काढत शिक्षण घेत होता. त्याच विशालने आता 35 टक्के गुण मिळवली आहेत.
या यशासोबतच विशालने आता महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढली आहे. येत्या काळात अधिकचे चांगले शिक्षण घेण्याची विशालची इच्छा आहे.. मात्र 35 टक्के मिळवलेल्या विशालने आपल्या गावकऱ्यांसह मित्र परिवाराचे लक्ष वेधून घेतले. गावकऱ्यांनी तर विशालचा 35% साठी सत्कारही केला आहे. गावकऱ्यांनी विशालच्या घरी जाऊन हार घालून त्याचे अभिनंदन केले. यावेळी विशालनेही यापुढे अभ्यास करुन चांगले मार्क्स मिळवणार असल्याचेही सांगितले.
( नक्की वाचा : Justice BR Gavai : देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, भावी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आईंची मोठी मागणी )
कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांचा डीजे लावून जल्लोष
दुसरीकडे कोल्हापूरमध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अनोखा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. दहावीचा निकाल लागल्यानंतर कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी थेट डीजे लावून जल्लोष केला. यंदा कोल्हापूर विभागाचा 96.78 टक्के इतका निकाल लागला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.