Lok Adalat E-Challan Fact Check: लोकअदालतीमध्ये ई-चलानची तडजोड होणार? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

Lok Adalat E-Challan Fact Check: 13 डिसेंबर 2025 रोजी राज्यभर राष्ट्रीय लोकअदालत करण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

येत्या 13 डिसेंबर 2025 रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वाहतूक विभागाशी संबंधित ई-चलान प्रकरणांवर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्टीकरण अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), मुंबई यांच्या कार्यालयाने दिले आहे. 13 तारखेला ई-चलान दंडावर मोठी सवलत मिळणार असल्याच्या अफवा सामाजिक माध्यमांवर पसरवल्या जात असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

नक्की वाचा: माणुसकी जपणारी मुंबई! सायन स्टेशनवरील मध्यरात्र, तो एकटा अन्... तरुणाने सांगितला हृदयस्पर्शी अनुभव

लोकअदालतीमध्ये ई-चलानच्या दंडात सवलत मिळणार असल्याची अफवा

मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ई-चलान प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सन 2021 पासून महाराष्ट्र राज्य विधी आणि सेवा प्राधिकरणाच्या मान्यतेने वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. तथापि, आगामी लोकअदालतीत वाहतूक विभागाकडून कोणतीही ई-चलान प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार नाहीत, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. या स्पष्टीकरणानंतरही यूट्यूब, इंस्टाग्राम आणि इतर सामाजिक माध्यमांवर 13 डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान दंडात मोठी सवलत मिळणार असल्याची माहिती चुकीच्या पद्धतीने पसरवली जात आहे, याकडे पोलीस विभागाचे लक्ष वेधले गेले आहे. अशा अफवांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी वेळीच सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नक्की वाचा: IndiGo ला सरकारचा शेवटचा इशारा, प्रवाशांचे अडकलेले पैसे कधी परत मिळणार परत? वाचा सविस्तर

फसवणूक होण्याचीही भीती

ई-चलान तडजोड किंवा दंडात सवलत याबाबत सामाजिक माध्यमांवरील अपप्रचारावर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही अनधिकृत लिंकद्वारे ई-चलानची रक्कम भरणा करू नये. जर एखाद्या नागरिकाचे प्रकरण स्थानिक जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाने तडजोडीसाठी ठेवले असल्यास, संबंधित न्यायालय किंवा स्थानिक वाहतूक पोलीसांशी थेट संपर्क साधावा असे पोलीस अधीक्षक (मुख्यालय) सुनील भारव्दाज यांनी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाच्या वतीने प्रसिध्दीपत्रक जारी करत स्पष्ट केले आहे. 

Topics mentioned in this article